प्रगती एक्स्प्रेसपाठोपाठ आणखी एक गाडी मुंबईहून पुण्यासाठी पनवेलमार्गे सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे. ही गाडी तीन तासांत प्रवास पूर्ण करणार आहे. मार्चपर्यंत ही गाडी सुरू करण्यासाठी रेल्वेचा प्रयत्न असून नवी मुंबई आणि पनवेलबरोबरच दुपारच्या वेळेत पुण्याला जाण्यासाठी ही गाडी उपलब्ध होणार आहे.  सकाळी कोयना एक्स्प्रेसनंतर थेट दुपारी २.३० वाजेपर्यंत सिंहगड एक्स्प्रेसपर्यंत मध्ये पुण्यासाठी एकही गाडी नाही. सध्या केवळ पुण्यासाठी इंद्रायणी एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन या गाडय़ा जातात. तर पुणेमार्गे कोयना एक्स्प्रेस (कोल्हापूर), सह्याद्री एक्स्प्रेस (कोल्हापूर) आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस (कोल्हापूर) या गाडय़ांना पुण्यापर्यंत प्रवास करता येतो. मात्र या सर्व गाडय़ा सकाळी आणि सायंकाळी वा रात्री आहेत. सध्या प्रगती एक्स्प्रेस पनवेलमार्गे जात असून या गाडीला प्रवाशांची विशेष पसंती असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. यामुळे नवी मुंबई, पनवेल येथील प्रवाशांना पुण्याला जाणे सोयीचे झाले आहे. प्रगती एक्स्प्रेसला एक वातानुकूलित चेअर कार डबा लावण्यात आला असून आणखी दोन डबे जोडण्यात येणार आहेत. त्यातील एक डबा मासिक पास धारकांसाठी ठेवण्याबाबत विचार सुरू आहे.