बारावीच्या परीक्षांवर सर्वतोपरी बहिष्कार टाकण्याचा निर्णय ‘महाराष्ट्र शिक्षणसंस्था महामंडळा’ने घेतला असला तरी मुंबई-ठाण्यातील तब्बल दीड हजार शाळांचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या ‘महामुंबई शिक्षणसंस्था संघटने’ने या बहिष्कारापासून लांब राहण्याची भूमिका घेतल्याने निदान मुंबई-ठाण्यातील विद्यार्थ्यांना तरी या बहिष्कार आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता नाही.
‘महामुंबई शिक्षणसंस्था संघटना’ ही शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात एकत्र आलेल्या शिक्षक, पालक आणि संस्थाचालकांच्या ‘शिक्षण हक्क कृती समिती’ची सदस्य आहे. समितीच्या मागण्यांवर संबंधितांनी एकत्र यावे यासाठी समितीचे अध्यक्ष प. म. राऊत, निमंत्रक अमोल ढमढेरे यांनी राज्यभर तब्बल १६ सभा घेतल्या. राऊत हे ‘महामुंबई शिक्षणसंस्था संघटने’चेही अध्यक्ष आहेत. या संघटनेच्या मुंबई-ठाण्यातील तब्बल दीड हजार शाळा सदस्य आहेत. त्यामुळे, ही संघटना मुंबई-ठाण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. समितीच्या सभांच्या निमित्ताने राऊत यांना पालकांचा कल जाणून घेता आला.
समितीच्या आंदोलनांमध्ये पालकांनाही सहभागी करून घ्यायचे असेल तर त्यांना दुखवून चालणार नाही. त्यामुळे, महामंडळाच्या आदोलनापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे प. म. राऊत यांनी सांगितले.
पालकांचा कृती समितीच्या मागण्यांना पाठिंबा आहे. मात्र, बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकून विद्यार्थ्यांची अडवणूक करणे आपल्याला मान्य नाही. तसे झाल्यास समिती आंदोलनांपासून आम्ही दूर राहू, अशी पालकांची भूमिका आहे. परिणामी राऊत यांच्या संघटनेनेही या आंदोलनापासून लांब राहण्याचे ठरविले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Feb 2013 रोजी प्रकाशित
बारावी परीक्षांना मुंबई, ठाण्यात धोका नाही
बारावीच्या परीक्षांवर सर्वतोपरी बहिष्कार टाकण्याचा निर्णय ‘महाराष्ट्र शिक्षणसंस्था महामंडळा’ने घेतला असला तरी मुंबई-ठाण्यातील तब्बल दीड हजार शाळांचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या ‘महामुंबई शिक्षणसंस्था संघटने’ने या बहिष्कारापासून लांब राहण्याची भूमिका घेतल्याने निदान मुंबई-ठाण्यातील विद्यार्थ्यांना तरी या बहिष्कार आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता नाही.
First published on: 18-02-2013 at 03:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No danger to 12th examinations in mumbai and thane