मुंबई विद्यापीठाला हादरवून टाकणाऱ्या गेल्या वर्षीच्या टीवायबीकॉम पेपरफुटीच्या प्रकरणाशी ‘साधम्र्य’ असणारी एक पेपरफुटी शनिवारी होता होता वाचली. टीवायबीकॉमच्या पेपरफुटीत भिवंडीच्या ‘बीएनएन’ महाविद्यालयाचा हात असल्याने त्याचे खापर विद्यापीठावर फुटले नाही. परंतु शनिवारचा पेपर फुटला असता तर त्याचे खापर नक्कीच विद्यापीठाच्या माथ्यावर फुटले असते. अर्थात या ‘न घडलेल्या’ ‘घटने’ला विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील पेपर सेटर्सचा गलथान कारभार जबाबदार होता. सुदैवाने परीक्षार्थीनी आणि पर्यवेक्षकांनी जागरूकता दाखविल्याने पुढचा अनर्थ टळला.
एमएस्सी पर्यावरण विज्ञान या विषयाच्या पहिल्या वर्षांची सत्र दोनची परीक्षा शनिवारी पार पडली. मुंबईतील नऊ परीक्षा केंद्रांवर झालेल्या या परीक्षेला १३७ विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांची ‘पेपर क्रमांक एक’ची परीक्षा शनिवारी होणार होती. परंतु विद्यार्थ्यांच्या हातात जी प्रश्नपत्रिका पडली ती ‘पेपर क्रमांक चार’ची. पेपर आणि प्रश्न भलतेच दिसल्याने विद्यार्थी चक्रावून गेले.
रूपारेल महाविद्यालयातील परीक्षार्थीनी हा प्रकार पर्यवेक्षकांच्या लक्षात आणून दिला. त्यांनी प्रश्नपत्रिका तपासून विद्यार्थ्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधला. तोपर्यंत परीक्षा विभागात अन्य परीक्षा केंद्रांवरून पर्यवेक्षकांच्या तक्रारी धडकू लागल्या होत्या. परीक्षा विभागाने तातडीने वेबलिंकच्या माध्यमातून ‘पेपर क्रमांक एक’ संबंधित परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्याची व्यवस्था केली.
प्रश्नपत्रिकेची प्रिन्टआऊट काढून त्याच्या फोटोकॉपी करेपर्यंत वेळ लागणार असल्याने काही परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांनी मुलांना घेऊन सरळ महाविद्यालयाच्या कॅण्टीनचा रस्ता धरला. मुलांनी अस्वस्थ होऊन गोंधळ घालू नये, म्हणून त्यांना कॅण्टीनमध्ये गुंतवून ठेवण्याचा हा मार्ग पथ्यावर पडला. चहापाणी होईपर्यंत प्रश्नपत्रिकेच्या फोटोकॉपी तयार करण्यात आल्या. अकराची परीक्षा सुरू होईपर्यंत साडेबारा वाजले. पण, चहापाणी घेऊन ताजेतवाने झालेल्या विद्यार्थ्यांनी वर्गात येऊन मुकाटपणे पेपर लिहिला आणि पर्यवेक्षकांना कोणत्याही गोंधळाविना परीक्षा घेण्यात यश आले.
या बाबत परीक्षा विभागाचे नियंत्रक दीपक वसावे यांना विचारले असता त्यांनी दुजोरा दिला. पेपर सेटरनी (प्राश्निक) क्रमांक एकच्या प्रश्नपत्रिकेच्या पाकिटात चुकून चारची प्रश्नपत्रिका टाकल्याने हा गोंधळ झाल्याचे त्यांनी सांगितले.
टीवायबीकॉमच्या पेपरफुटीला भिवंडीच्या महाविद्यालयातील पर्यवेक्षकांचा भोंगळपणा नडला. त्यानंतर विद्यापीठाने चौकशी समितीच्या माध्यमातून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेचेच ‘स्कॅनिंग’ करून सतराशेसाठ बदल केले. पण, हे बदल करूनही परीक्षा विभागात त्याच त्याच चुका पुन्हा होत असतील, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न आहे.