हस्तांतर झालेली खातीही बनावट;
आणखी ११ जणांचा शोध सुरू
मुलुंडमधील व्यावसायिक अंकुर कोराने यांना एक कोटी रुपयांचा ऑनलाईन ‘गंडा’ घालण्याच्या क्लृप्तीला बँकेतील कर्मचाऱ्यांची साथ असावी, त्याशिवाय असा उद्योग शक्यच नसल्याच्या निष्कर्षांप्रत पोलीस आले आहेत. बँक खात्यातून आरटीजीएस प्रणालीद्वारे ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी ग्राहकाचा आणि बँकेचा असे दोन पासवर्ड आवश्यक असतात. या खात्यावर नजर ठेवून अगदी पद्धतशीरपणे वेगवेगळ्या बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे १२ खाती उघडून पैसे लंपास केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी वसईतून अटक करण्यात आलेल्या ट्राय परेरा याच्या ज्या खात्यातून मुलुंड पोलिसांनी ३० लाख रुपये परत मिळविले, ते खातेही बनावट कागदपत्रे सादर करून उघडण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. उर्वरित ११ खातीही बनावट कागदपत्रांच्या आधारेच उघडण्यात आल्यामुळे या मागे टोळी असल्याची शक्यता उपायुक्त महेश घुर्ये यांनी व्यक्त केली.
आपल्या खात्यातून एक कोटी रुपये वेगवेगळ्या १२ खात्यात हस्तांतरित झाल्याचे गुरुवारी सकाळी ९.१५ ते १०.३० या काळात लक्षात येताच कोराने यांनी बँकेत धाव घेतली. परंतु बँकेने त्यांना मदत करण्यास असमर्थतता दर्शविली. त्यामुळे ते वांद्रे-कुर्ला संकुलातील सायबर पोलीस ठाण्यात गेले. एक कोटीची फसवणूक असतानाही तेथील पोलिसांनी कोराने यांना मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. या फसवणुकीबाबत कळताच वरिष्ठ निरीक्षक जिवाजी जाधव यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला, ५३ लाख रुपये वाचले, पण या काळात कोराने यांच्या खात्यातून हस्तांतरित झालेले काही पैसे परस्पर काढून घेण्यात आरोपी यशस्वी ठरले. कोराने थेट पोलीस ठाण्यात आले असते वा सायबर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला असता तर सर्वच्या सर्व एक कोटी रुपये वाचू शकले असते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
ऑनलाईन फसवणुकीसाठी बडय़ा खासगी बँकेत खाती उघडण्यात आली होती. विशेष म्हणजे या खात्यांबाबतच तपशील मिळावा, म्हणून मुलुंड पोलिसांनी ३१ जानेवारी रोजी संबंधित बँकांना पत्र दिले. परंतु अद्याप या बँकांनी तपशील दिलेला नाही. ही खाती बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने उघडण्यात आल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या सहभागाची शक्यता वरिष्ठ पोलीस सूत्रांनी वर्तविली
आहे.खात्यात पैसे हस्तांतरित केले गेले तो परिसर – घाटकोपर, मीरा रोड, वसई, विरार पूर्व, वाशी, खार, गोरेगाव तसेच अमरोहास अलीगड, फतेहबाद, खुर्जा (उत्तर प्रदेश).
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2013 रोजी प्रकाशित
‘ऑनलाईन गंडा’ बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच!
हस्तांतर झालेली खातीही बनावट; आणखी ११ जणांचा शोध सुरू मुलुंडमधील व्यावसायिक अंकुर कोराने यांना एक कोटी रुपयांचा ऑनलाईन ‘गंडा’ घालण्याच्या क्लृप्तीला बँकेतील कर्मचाऱ्यांची साथ असावी, त्याशिवाय असा उद्योग शक्यच नसल्याच्या निष्कर्षांप्रत पोलीस आले आहेत.
First published on: 04-02-2013 at 03:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online cheating with the help of bank employees only