लहान बाळाने पाळण्यात डोळे उघडले की ताबडतोब त्याच्या डोळ्यासमोर मोबाइल स्क्रीनवरची गाणी दाखवली जाऊ लागतात. पण हे व्हिडीओज त्यांच्या वयाच्या मुलांना दाखवणे योग्य आहे की नाही याचा विचार होताना दिसत नाही. मानसशास्त्राचा अभ्यास करून कोणत्या वयाच्या मुलाला ऑनलाइन प्रशिक्षणाद्वारे कसे विकसित करता येईल यावर विचार करून एक ऑनलाइन व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा विचार झाला असून या शिक्षणाला ऑनलाइन दिशा मिळणार आहे.
एकविसाव्या शतकातील पिढीला पाळण्यातच मोबाइल दाखविला जातो. बाळ पाळण्यात असतानाच गाणी ऐकवली जातात. थोडे मोठे झाले की त्यांना व्हिडीओज दाखविले जातात. पण अनेकदा ऑनलाइन उपलब्ध असलेले व्हिडीओज त्या मुलांच्या दृष्टीने किती उपयुक्त आहेत हे पाहिले जात नाही. यामुळे विनाकारण त्यांना लहान वयात मोठय़ा मुलांचे व्हिडीओज दाखविले जातात किंवा मोठय़ा वयात लहान मुलांचे व्हिडीओज पाहण्याची सवय लागते. यातून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे माहितीच्या महाजालात उपलब्ध असलेल्या व यापासून लांब असलेल्या अनेक उपयुक्त व्हिडीओज एकत्र करून लहान मुलांच्या विकासाला दिशा देण्याची गरज असल्याचे जॉन्सन अॅण्ड जॉन्सनमध्ये लहान मुलांच्या उत्पादनात काम करत असताना मनोज बारोट यांना ही बाब जाणवली. सतत लहान मुलांच्या पालकांशी संपर्क येत असल्याने आणि स्वानुभवामुळे बारोट यांना पालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणात नेमक्या काय अडचणी आहेत हे जाणवू लागले. पालकांच्या या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी बारोट यांनी ऑनलाइन व्यासपीठ विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत त्यांच्या इतर तीन मित्रांनीही साथ दिली आणि अॅपीची निर्मिती झाली.
हे अॅप विकसित करणे म्हणजे एक मोठे आव्हान होते. यासाठी कंपनीने विविध पालकांशी बोलून एक अभ्यास सादर केला. या अभ्यासात कोणत्या वयाच्या पालकांना आपल्या मुलाचे पालन करताना कोणत्या अडचणी येतात याचा आढावा घेण्यात आला. यातून विविध वयोगटातील पालकांच्या विविध समस्यांनुसार तोडगा काढण्याचा विचार केला. मग लहान मुलांचे मानसोपचारतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ अशा लोकांचा एक चमू तयार करून या माध्यमातून विविध वयोगटातील विद्यार्थ्यांचा विकास कसा करता येईल याचा एक आराखडा तयार करण्यात आला. हा आराखडा देशातील शिक्षण पद्धती तसेच परदेशातील शिक्षण पद्धतींचा विचार करून करण्यात आला आहे. देशात दोन ते चार वयोगटातील विद्यार्थ्यांचा विकास कसा करावा यासाठी कोणतीही ठोस अशी प्रक्रिया उपलब्ध नाही. यानिमित्ताने ही एक प्रक्रिया तयार झाली आहे. यानंतर मुलांच्या विकासासाठी जगभरात उपलब्ध असलेल्या ऑनलाइन शिक्षण प्रणालींचाही अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून प्रत्येक गटाला उपयुक्त असे विविध व्हिडीओज एकत्रित करण्यात आले. यात विविध गाणी, गोष्टी तसेच विविध क्षमता वाढविणाऱ्या व्हिडीओजचा समावेश करण्यात आला. हे व्हिडीओज केवळ ऑनलाइन उपलब्ध असलेले मोफत व्हिडीओज नसून कंपनीने जगभरातील १५ ते २० ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या कंपन्यांशी करार केला आहे. या कंपन्यांनी विकसित केलेले व्हिडीओज पाहून ते वयोगटानुसार निवडले जातात. आजमितीस अॅपमध्ये प्रत्येक वयोगटासाठी विविध गटांतील सुमारे पाच हजार व्हिडीओज उपलब्ध आहेत. यामध्ये केवळ व्हिडीओज नव्हे तर ऑडिओजचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच हे शिक्षण केवळ ऑनलाइन न ठेवता त्याला ऑफलाइनचीही जोड देण्यात आली आहे. यासाठी दर महिन्याला घरी मुलांच्या विकासासाठी आवश्यक अशा किमान २५ वर्कशीट्स पाठविल्या जातात. यामुळे ऑफलाइन कामही या माध्यमातून केले जाते. अशा प्रकारे काम करणारे हे एकमेव अॅप असल्याचे बारोट यांनी नमूद केले. हे अॅप १५ दिवस मोफत वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यानंतर दरमाह ३०० रुपये आकारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. सुरुवातीला मोफत सुविधा दिली त्या वेळेस पालकांनी जो प्रतिसाद दिला तोच प्रतिसाद पैसे देऊन सुविधा उपलब्ध करून दिल्यावरही मिळत असल्याचे बारोट यांनी सांगितले.
गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत
या कंपनीसाठी पीपल्स समूहाकडून आर्थिक साहाय्य मिळाले. ही कंपनी मौज मोबाइल या कंपनीने दत्तक घेतली आहे. कंपनीचे मुख्य उत्पन्नस्रोत हे वर्गणीतून होत आहे.
भविष्यातील वाटचाल
सध्या हे अॅप इंग्रजी आणि हिंदी यामध्ये उपलब्ध असून मराठीतही तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच हे अॅपला जास्तीत जास्त वापरकर्ते मिळवण्याकडे आमचे लक्ष्य असल्याचेही बारोट यांनी नमूद केले.
नवउद्यमींना सल्ला
नवउद्यमींनी उद्योग सुरू करताना उद्योग पहिल्या दिवसापासून उत्पन्न कसे कमवेल याकडे लक्ष द्यावे. जेणेकरून भविष्यात तोटा सहन करावा लागणार नाही. तसेच समाजात नेमकी कोणती समस्या आहे. ही समस्या किती मोठी आहे याचा विचार करून त्यावर आपण काय उत्तर देऊ शकतो याचा अभ्यास करावा असा सल्ला बारोट यांनी दिला.
@nirajcpandit