देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी राज्य सरकार आता ‘ओपन शेल्टर होम’ तयार करणार आहे. या शेल्टर होम अर्थात निवारागृहात या देहविक्री करणाऱ्यांच्या मुलांचे संगोपन केले जाणार आहे. यामुळे या मुलांना अनैतिक तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर ठेवण्यास मदत होणार आहे.
परिस्थितीमुळे अनेक महिला या व्यवसायात ओढल्या जातात. छोटय़ा खोलीत त्यांना हे काम करावे लागते. पण लहान मुलांना अन्यत्र ठेवण्याचा पर्याय नसल्याने मुलांना झोपवून किंवा त्यांच्या समोरच हे काम त्यांना करावे लागते. त्याच वातावरणात राहून ही मुले त्याच अनैतिक व्यवसायात आणि पुढे गुन्हेगारीकडे वळतात. आता या महिलांसाठी राज्य सरकारने निवारागृह तयार करण्याचे ठरवले आहे. राज्यातल्या ३५ जिल्’ाामध्ये हे निवारा केंद्र टप्प्याटप्प्याने महिला बाल विकास खात्यातर्फे तयार केले जाणार आहे. मुंबईत ‘प्रेरणा’ या संस्थेतर्फे अशा प्रकारचे रात्रीचे पाळणागृह चालवले जाते. त्याच धर्तीवर हे निवारा केंद्र सुरू केले जाणार असल्याची माहिती महिला बाल विकास मंत्री वर्षां गायकवाड यांनी दिली. ही निवारा गृह त्यांच्या परिसरापासून दूर असतील. तसेच जेव्हा महिला देहविक्रीसाठी जातील तेव्हा या निवारा केंद्रात त्यांना ठेवून जाऊ शकतील. या केंद्रातील कर्मचारी त्यांच्या लहान मुलांचा सांभाळ करतील.