सायंकाळी साडे पाच वाजता जुहू बीच ते कैफी आझमी पार्क दरम्यान ‘मूक मोर्चा’ काढत मुंबईकरांनी पीडित तरुणीला श्रद्धांजली वाहिली. तर ‘आझाद मैदान’मध्येही महिला संघटनांनी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी निदर्शने केली. बलात्काऱ्यांना इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे की शिक्षेच्या विचारानेही नराधमांचा थरकाप उडाला पाहिजे, अशी मागणी करण्यात येत होती.
सायंकाळी जुहू बीचवरून निघालेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते त्याचबरोबर शबाना आझमी, जावेद अख्तर, जया बच्चन, हेमा मालिनी, प्रसून जोशी, ओम पुरी, सोनाली बेंद्रे, रणवीर सिंग, कैलास खेर, आदी बॉलिवूडची मंडळीही सामील झाली. डोक्यावर काळी पट्टी आणि हातात मेणबत्ती घेत या जमावाने शांतपणे मोर्चा काढत या घटनेचा तीव्र निषेध केला. बलात्काराची सामाजिक विकृती, ती रोखण्यात अपयशी ठरणारी व्यवस्था या गोष्टींचा या वेळी धिक्कार करण्यात आला.
देशात अशा घटना घडत असताना जिन्हें नाज़्ा है हिंद पर वो कहाँ हैं? असा प्रश्न मनात निर्माण होतो, असे सांगत अशारितीने मोर्चा काढून काही होत नसते हा समज अत्यंत चुकीचा आहे. जेसिका लाल आणि इतरही अशा प्रकरणांत समाज जागृत झाल्यावरच पीडितांना न्याय मिळाला, याची आठवण अभिनेता ओम पुरी यांनी करून दिली.
आपण आता जागे झाले पाहिजे असा धोक्याचा इशारा या दुर्दैवी घटनेने दिला आहे. हा संताप असाच वाया गेला, तर ती त्या मुलीशी केलेली प्रतारणा ठरेल. देशाने- समाजाने आत्मपरीक्षण करून ठोस बदल करण्याची वेळ आली आहे, अशी भावना शबाना आझमी यांनी व्यक्त केली.
या बलात्काराच्या घटनेबद्दल राज्यसभेत आवाज उठवणाऱ्या खासदार जया बच्चन यांना मोर्चापुढे बोलताना पुन्हा एकदा अश्रू अनावर झाले. देशातील सर्व महिला, पिता, भाऊ यांची माफी मागते. आमच्या पिढीने अशा घटनांकडे काणाडोळा केला. यापुढे मात्र अशा घटना घडणार नाहीत अशी शपथ आज आपण घेऊयात. देशाचे नाव या घटनेमुळे धुळीस मिळाले आहे, असे कठोर उद्गार त्यांनी काढले. गीतकार प्रसून जोशी यांनी ‘बाबूल जिया मोरा घबराए’ ही एका युवतीची मानसिकता उलगडून दाखवणारी कविता यावेळी ऐकवली.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2012 रोजी प्रकाशित
मुंबईवरही शोककळा. . .
दिल्लीतील सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या तरुणीचे निधन झाल्याची बातमी थडकताच मुंबईवरही शोककळा पसरली आणि संतापाचीही लाट उसळली. बॉलिवूड कलावंतांनीही हजारो लोकांच्या बरोबरीने शनिवारी रस्त्यावर उतरत आक्रोश व्यक्त केला. बलात्काराच्या विकृतीचा या वेळी धिक्कार करण्यात आला.
First published on: 30-12-2012 at 03:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peaceful protests in mumbai to mourn death of gang rape victim