बंदोबस्तावरील पोलिसांच्या मोटारसायकलीला धडक देऊन फरारी झालेल्या एका वैमानिकाला शिवाजी पार्क पोलिसांनी गुरुवारी अटक केली. कुशग्रह कुमार असे या वैमानिकाचे नाव असून तो जेट एअरवेजमध्ये कामाला आहे. बुधवारी संध्याकाळी शिवाजी पार्क येथे हा अपघात घडला.
शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल करंबळेकर आणि पोलीस हवालदार घिसाडी हे बुधवारी संध्याकाळी मोटारसायकलीवरून गस्तीसाठी जात होते. एका लाल रंगाच्या वाहनाने त्यांच्या मोटारसायकलीला धडक दिली. या अपघातात करंबळेकर आणि घिसाडी दोघेही जखमी झाले. यावेळी धडक देणारा वाहनचालक घटनास्थळावरून फरारी झाला. शिवाजी पार्क पोलिसांनी गुरुवारी या वाहनाचा चालक कुशग्रह कुमार याला नवी मुंबईच्या नेरूळ येथे राहत्या घरातून अटक केली. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता वैयक्तिक जामिनावर त्याची सुटका करण्यात आली.
कुशग्राह याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याचा अहवाल आल्यानंतर त्याने मद्यपान केले होते की नाही ते स्पष्ट होईल आणि त्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pilot arrested for kicking police on duty