महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त २८ नोव्हेंबरला पुण्यात समता दिनाचे आयोजन करुन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांच्याच अधिपत्याखालील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जोरदार तयारीला लागली आहे.
राष्ट्रवादीमधील अंतर्गत राजकारणामुळे तसेच भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागल्याने छगन भुजबळ सध्या अस्वस्थ आहेत.  आपण ओबीसी असल्याने आपल्याला टार्गेट केले जाते, अशी अस्वस्थता त्यांनी अलीकडेच नाशिक येथे माळी समाजाच्या मेळाव्यात बोलून दाखविली होती. त्यावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राष्ट्रवादीमधूही त्यांच्यावर टीका झाली होती.   राष्ट्रवादी काँग्रेसला समांतर अशी महात्मा फुले समता परिषद ही संघटना भुजबळ यांनी सुरु केली आहे. फुले यांच्या २८ नोव्हेंबरच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुण्यात समता दिनाचे आयोजन करुन भुजबळ यांनी आपल्या समर्थकांची गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे.  सकाळी समता दिनाच्या कार्यक्रमाला स्वत छगन भुजबळ, पुण्याचे पालकमंत्री सचिन अहिर, खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, बापुसाहेब भुजबळ, त्याचबरोबर पुणे जिल्ह्य़ातील जवळपास सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. समता परिषदेच्या वतीने पुणे विद्यापीठाला भेट देण्यात आलेल्या महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी मोठी गर्दी जमविण्यासाठी समता परिषद कामाला लागली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात भुजबळ काय बोलणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pule death anniversary bhujbal ready to show his power