समुद्राला उधाण आल्यामुळे उसळलेल्या सर्वाधिक उंचीच्या लाटांचा अनुभव बुधवारी दुपारी मुंबईकरांनी घेतला. मुंबईच्या समुद्रकिनाऱयावर बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ४.९५ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. उसळणाऱया लाटांचा आनंद लुटण्यासाठी मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, सोमवारी रात्रीपासून धो-धो बरसणाऱया पावसाने बुधवारी दुपारी विश्रांती घेतली. पाऊस ओसरल्याने सखल भागामध्ये साठलेले पाणी कमी झाल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक हळूहळू सुरळीत होऊ लागल्याचे चित्र आहे. 
सोमवारी रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात पाणी साठल्यामुळे आणि कामाची वेळ गाठण्यासाठी दक्षिण मुंबईकडे येण्यासाठी चाकरमान्यांच्या वाहनांनी गर्दी केल्यामुळे बुधवारी सकाळी मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही द्रुतगती मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. याच वाहतूक कोंडीमध्ये ट्रकची धडक बसल्याने एका दुचाकीस्वाराला प्राणाला मुकावे लागले. ईश्वरचंद मौर्या असे या मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. ठाण्यात तीनहात नाका परिसरात ही घटना घडली.
मुंब्रा बाह्यवळण मार्गावर सुमारे एक किलोमीटरचा रस्ता खचल्याने या भागातील वाहतूक अन्य रस्त्यांवरून वळविण्यात आली. वाहतूक वळविल्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पावसामुळे रस्ता खचल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain continues in mumbai traffic jam on all roads