शेकडो शिक्षकांच्या विभागात प्रतिनियुक्त्या झाल्याने शाळा आणि विद्यार्थ्यांची परवड

एखाद्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक तर दुसरीकडे शिक्षकांची वानवा, शाळेत असलेल्या शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त कामे असा सगळा सावळागोंधळ असतानाच त्यात आता भर म्हणून शेकडो शिक्षकांच्या शिक्षण विभागात नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या शिक्षकांच्या बदली  दुसरे शिक्षकही शाळांना देण्यात आलेले नाहीत. त्याचवेळी शिक्षण विभागात नियुक्त झालेल्या शिक्षकांची नेमकी कार्यकक्षाही निश्चित करण्यात आली नसल्याने तेही या नियुक्तीवर समाधानी नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या अनागोंदी कारभाराची शिक्षा शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वाना भोगावी लागत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांना गेल्या वर्षांपासून शिक्षण विभागात प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले आहे. पाच वर्षांसाठी या शिक्षकांनी शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून कामे करायची अशी संकल्पना या मागे आहे. या शिक्षकांची शाळेतील सेवाज्येष्ठताही राखून ठेवण्यात आली आहे. त्यानुसार शेकडो शिक्षक विद्याप्राधिकरण, विभागीय विद्याप्राधिकरणे आणि जिल्हा शैक्षणिक व्यावसायिक विकास संस्था येथे रूजू झाले.

शिक्षण विभागात मोठय़ा प्रमाणावर असलेली रिक्त पदे भरण्याचा सरकारचा हेतू यामुळे सफल झाला. मात्र ज्या शाळांमध्ये हे शिक्षक शिकवत होते, तेथे अर्धे शैक्षणिक वर्ष सरले असूनही बदली शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळांमध्ये अनेक विषयांसाठी शिक्षकच नाहीत, अशी देखील परिस्थिती आहे.

शिक्षकांची नियुकती त्यांच्या इच्छेनुसार करण्यात आली आहे. मात्र काहीतरी वेगळे करायला मिळेल म्हणून उत्साहाने या नव्या मोहिमेवर गेलेल्या शिक्षकांच्या पदरीही निराशा आली आहे.

नियुक्ती तांत्रिक अडचणीत

विद्याप्राधिकरणे आणि विभागीय प्राधिकरणांमधील ८९ पदे शाळांमधून भरण्याचा सरकारचा विचार होता. त्याचप्रमाणे प्रत्येक ‘जिल्हा शैक्षणिक व व्यावसायिक विकास संस्थे’त विषय समन्वयक म्हणून १० ते १२  शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी जवळपास  ४०० पदे शिक्षकांमधून भरण्यात आली आहेत. तांत्रिकदृष्टय़ा हे सर्व अजूनही शिक्षक असून त्यांचा पगारही सरकार देत आहे. त्यामुळे त्यांच्या पदावर दुसरे शिक्षक नियुक्त करता येऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे या पदांचे शिक्षण विभागाच्या पदांमध्ये रुपांतर करण्यात आलेले नाही. त्यामुळे शाळांमधील शेकडो शिक्षक कमी होऊनही शाळांना शिक्षक मिळालेलेच नाहीत.

शिक्षकांची कार्यकक्षाही निश्चित नाही

ज्या शिक्षकांची शिक्षण विभागात नियुक्ती करण्यात आली त्यापैकी अनेकांना सध्या अहवाल भरण्याचीच कामे करावी लागत आहेत. जिल्हा विकास संस्थांमधील शिक्षकांना प्रशिक्षणे असतील तेव्हा ती देण्याचे काम करावे लागते. मात्र अध्यापन आणि गुणवत्ता विकासाशी संबंध असलेली कामे फारशी नसल्याची तक्रारही काही शिक्षकांकडून करण्यात येत आहे.  नियुक्त केलेल्या शिक्षकांची निश्चित कार्यकक्षाच ठरलेली नाही. त्यामुळे शाळांमध्ये शिक्षक नाहीत आणि शिक्षण विभागात शिक्षक बसलेले अशी परिस्थिती आहे.

शिक्षकांची शिक्षण विभागात प्रतिनियुक्ती हे राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असण्याचे हे एकमेव कारण नाही. पूर्वीपासूनच पदे रिक्त आहेतच. प्रतिनियुक्तीवर घेतलेल्या शिक्षकांची संख्याही फार मोठी नाही. संस्थामध्ये जी पदे निर्माण करायची होती त्याबाबत सरकारची उच्चस्तरीय समिती काम करत आहे. त्यानंतर या पदांचे शिक्षण विभागात रुपांतर होऊ शकेल आणि प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांच्या जागी दुसरे शिक्षक भरता येतील.

नंदकुमार, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग