लोकलचे तिकीट, पास पुन्हा महागणार
* किमीमागे २ ते १० पैशांची वाढ
* २१ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू
* लांब पल्ल्याचा प्रवासही महागला
नववर्षांच्या पहिल्याच दिवसापासून मुंबईतील लोकलच्या तिकीटदरांत वाढ करणाऱ्या रेल्वेने लोकलसह लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे प्रवासभाडे वाढवण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. ही वाढ किमीमागे २ ते १० पैसे इतकीच असली तरी या अनपेक्षित दरवाढीने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. ही दरवाढ येत्या २१ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचे रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी नवी दिल्लीत जाहीर केले.
मूळ प्रवासी भाडय़ात प्रत्येक किमी अंतरासाठी दोन पैसे किमान वाढ केल्याने पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रलच्या पुढे आणि मध्य रेल्वेवर भायखळा तसेच हार्बर मार्गावर डॉकयार्ड रोडच्या पुढील प्रवास महागणार आहे. भाडेवाढीतून प्लॅटफॉर्म तिकिटाला वगळण्यात आले आहे. प्रवाशांना द्यावयाच्या सुविधा आणि सुरक्षेसाठी ही भाडेवाढ करण्यात आल्याचे बन्सल यांनी म्हटले असून, आगामी रेल्वे अंदाजपत्रकात आणखी भाडेवाढ होणार नसल्याची ग्वाही दिली आहे. माल वाहतुकीच्या भाडेवाढीविषयी मात्र त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. यापूर्वी शेवटची प्रवासी भाडेवाढ नितीशकुमार रेल्वेमंत्री असताना करण्यात आली होती. यूपीए सरकारमधून ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे १९९६ नंतर प्रथमच रेल्वेमंत्रिपद काँग्रेसकडे आले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विश्वासातील पवनकुमार बन्सल यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली तेव्हाच रेल्वेचे अर्थकारण बदलले जाण्याचे संकेत मिळाले होते.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

का झाली भाडेवाढ?
सन २००४-०५ साली प्रवासी भाडय़ापोटी भारतीय रेल्वेला १०५९ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तो २०१०-११मध्ये सुमारे २० हजार कोटींवर पोहोचला. दरवर्षी या तोटय़ात १८ टक्क्यांची भर पडत असल्यामुळे चालू वित्तीय वर्षांत तो २५ हजार कोटींवर पोहोचू शकतो, असे भाडेवाढीची कारणे देताना बन्सल यांनी स्पष्ट केले. आजच्या भाडेवाढीमुळे रेल्वे खात्याला दरवर्षी ६,६०० कोटींचे अतिरिक्त उत्पन्न होणार असून चालू वित्तीय वर्षांत २१ जानेवारी ते ३१ दरम्यान १२०० कोटी रुपयांची महसूलप्राप्ती होणार आहे.

भाडेवाढ (प्रत्येक किमीमागे)
* लोकल द्वितीय श्रेणी २ पैसे
* बिगर उपनगरी द्वितीय श्रेणी ३ पैसे
* मेल/एक्स्प्रेस द्वितीय श्रेणी ४ पैसे
* शयनयान श्रेणी ६ पैसे
* वातानुकूलित खुर्ची श्रेणी १० पैसे
* वातुनुकुलित ३ टायर श्रेणी १० पैसे
* प्रथम श्रेणी ३ पैसे
* वातानुकुलित २ टायर ६ पैसे
* वातानुकुलित प्रथम श्रेणी १० पैसे

प्रथम श्रेणी, वातानुकुलित २ टायर आणि वातानुकुलित प्रथम श्रेणीच्या तिकीटदरांत याआधीच किमीमागे अनुक्रमे १०, १५ आणि ३० पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या श्रेणींसाठीचे नवे दर प्रति किमी अनुक्रमे १३, २१ आणि ४० पैसे इतके असेल.

* लोकलच्या द्वितीय श्रेणीतील प्रवासासाठी ३५ किमीसाठी २ रुपये
* बिगर उपनगरी द्वितीय श्रेणीच्या प्रवासासाठी १३५ किमीमागे ५ रुपये
* शयनयान श्रेणीच्या प्रवासासाठी ७७० किमीमागे ५० रुपये
* वातानुकुलित खुर्ची श्रेणी ३८७ किमीमागे ४० रुपये.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second attack from railway