मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, तसेच पालक-विद्यार्थ्यांना आकर्षित करून शाळांमधील पटसंख्या वाढविण्याच्या उद्देशाने सेमी इंग्लीश शाळा सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिका शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी त्यांना २७ शालोपयोगी वस्तूंसोबतच सकस आहार योजनाही सुरू करण्यात आली आहे. आता सेमी इंग्लीश शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणित आणि सामान्य विज्ञान हे विषय इंग्रजीतून शिकविण्यासाठी पालिका शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त सुनील धामणे यांनी दिली. इयत्ता नववी आणि दहावीमधील विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीतून शिक्षण देण्यात येत आहे. पालिकेच्या विविध माध्यमांच्या शाळांमध्ये ९०० शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. हिंदी माध्यमासाठी ४००, उर्दू माध्यमासाठी २९० शिक्षकांची भरती करण्यात येणार असून उर्वरित माध्यमांसाठी सुमारे २१० शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.