मुंबई महापालिकेने झोपडपट्टय़ांमध्ये बसविलेले सौर दिवे देखभालीअभावी बंद पडल्यामुळे झोपडपट्टीवासियांना अंधारातच वाट शोधावी लागत आहे. मात्र ही जबाबदारी कंत्राटदारावरच सोपवून महापालिका मोकळी झाली आहे. देखभालीची मुदत संपुष्टात आलेल्या सौर दिव्यांच्या जागी नवे दिवे बसविण्याचा मानस महापालिकेने व्यक्त केला आहे. झोपडपट्टय़ांमध्ये वीजपुरवठा करणे अशक्य असल्यामुळे महापालिकेने या वस्त्या सौर दिव्यांनी उजळवून टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काही वस्त्या प्रकाशमान झाल्या. परंतु कंत्राटदारांनी देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे बहुतांश सौर दिवे बंद पडले आहेत. या संदर्भात झोपडपट्टीवासियांनी पालिकेच्या संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. स्थानिक नगरसेवकांपुढे गाऱ्हाणे मांडले. तरी सौर दिवे दुरुस्त झाले नाहीत. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. काही ठिकाणी बसविलेल्या सौर दिव्यांच्या कंत्राटाची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे तेथे सौर दिव्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु कंत्राटदारांकडून त्यास प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून या वस्त्यांमध्ये नवे दिवे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.      

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solar lamp close for maintenance purpose