नववर्षांच्या पाश्र्वभूमीवर मुंबई, ठाण्यासह राज्यात सर्वत्र मद्यपि चालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केले आहेत. या काळात मद्यपि चालकांना वेळीच आळा घातला तर अपघात कमी होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सर्व पोलीस आयुक्तालय तसेच महासंचालक संजीव दयाळ यांनी या प्रकरणी पुढाकार घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई, ठाण्यासह पुण्यात तसेच महामार्ग पोलीस मद्यपि चालकांविरुद्ध कारवाई करीत आहेत. नववर्षांच्या स्वागताच्या निमित्ताने मद्यपानाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्यामुळे या काळात अधिकच सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांना गृहखात्याने दिल्या आहेत. मद्यपि चालकांविरुद्ध पहिल्यांदा मुंबईत कारवाई सुरू करण्यात आले. मुंबई पोलीस दलातील वाहतूक विभागाचे तत्कालीन सहआयुक्त विजय कांबळे यांनी २० जून २००८ मध्ये पहिल्यांदा ही कारवाई सुरू केली. त्यावेळी अशा मद्यपि चालकांविरुद्ध किरकोळ कारवाई होत होती. परंतु कांबळे यांनी पुढाकार घेतल्यानंतर मद्यपि चालकांविरुद्ध केवळ दंडात्मकच कारवाई नव्हे तर तुरुंगवासाचीही कारवाई होऊ लागली. ही कारवाई अद्यापही सुरू असल्यामुळे मुंबईत अपघातांना बऱ्यापैकी आळा बसला आहे. या पाश्र्वभूमीवर ही कारवाई राज्यात सर्वत्र सुरू करण्यात आली होती. महामार्ग विभागाचे अतिरिक्त महासंचालक असलेल्या कांबळे यांनी आता सर्व महामार्गावर अशी कारवाई सुरू केली आहे. नववर्षांच्या स्वागताच्या निमित्ताने अतिरेक होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई अधिक कठोर करण्याचे आदेश राज्याच्या प्रमुखांनीच आता दिल्याचे कळते. या बाबत दयाळ यांचा संपर्क होऊ शकला
नाही.
३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईच्या रस्त्यांवर १८ हजार पोलीस
दिल्लीतील सामुहिक बलात्कार आणि मुंबईतल्या महिलांवरच्या वाढलेल्या विनयभंगाच्या घटना लक्षात घेऊन येणाऱ्या ३१ डिसेंबरच्या नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. एकूणच सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी तब्बल १८ हजार पोलिसांनी रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईत सुरक्षा व्यवस्था कशी असावी त्याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. सहपोलीस आयुक्त सदानंद दाते (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गेट वे ऑफ इंडिया, जुहू बीच आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी बिनतारी संदेश यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. महिला छेडछाड विरोधी पथक प्रत्येक ठिकाणी तैनात करण्यात येणार असून गर्दीमध्ये साध्या वेषातले पोलीसही असणार आहे. हे पोलीस स्वत: व्हिडीयो चित्रिकरणही करणार आहेत. मागील अनुभव लक्षात घेता महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येईल, अशी माहिती दाते यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2012 रोजी प्रकाशित
मुंबई, ठाण्यासह राज्यभरात मद्यपि चालकांवर कठोर कारवाई होणार!
नववर्षांच्या पाश्र्वभूमीवर मुंबई, ठाण्यासह राज्यात सर्वत्र मद्यपि चालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केले आहेत. या काळात मद्यपि चालकांना वेळीच आळा घातला तर अपघात कमी होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सर्व पोलीस आयुक्तालय तसेच महासंचालक संजीव दयाळ यांनी या प्रकरणी पुढाकार घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

First published on: 26-12-2012 at 04:59 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strict action now on drunk and drive in mumbaithane