भरधाव वेगाने मोटारसायकल चालवून नाकाबंदीच्या पोलिसाला धडक दिल्याप्रकरणी १० मोटारसायकलस्वारांना पोलिसांनी अटक केली. मरिन ड्राईव्ह येथील तारापोरवाला मत्स्यालयासमोर मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली
 ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबईकर मोठय़ा संख्येन रस्त्यावर उतरतात. त्या बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी लावली होती. मंगळवारी पहाटे मोटारसायकल चालवणाऱ्या तरुणांचा गट भरधाव वेगाने जात होता. मोटारसायकलीवर मस्ती करत हा गट भरधाव वेगाने चालला होता. तारापोरवाला मत्स्यालयासमोर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. मात्र या तरुणांनी नाकाबंदी न जुमानता पोलिसांनी लावलेले बॅरीकेडसही उडवले. बंदोबस्तासाठी असलेले पोलीस निरीक्षक पवार त्यांच्या धडकेत जखमी झाले. इतर पोलिसांनी या सर्व १० जणांना अटक केली. हे सर्व तरूण भांडुप, मुंब्रा येथे राहणारे आहेत.