नागरिकांना कर भरणे सोयीचे व्हावे, यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तसेच रविवारी कर वसुली कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या अर्थिक वर्षांतील कर आणि पाणी बिलांची रक्कम नागरिकांना वेळेत भरता यावी, या करिता महापालिकेची सर्व प्रभाग समिती कार्यालये सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहेत.दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुद्धा नागरिकांना कर भरता येईल. तसेच रविवारी सर्व प्रभाग समिती कार्यालयातील कर आणि पाणीपट्टी वसुली विभाग सकाळी १०.३० ते दुपारी २ या वेळेत कार्यरत असणार आहे. मात्र, २७ मार्चला धुलीवंदन असल्याने सर्व प्रभाग समिती कार्यालये बंद राहणार आहेत, असे महापालिका प्रशासनाने कळविले आहे. मालमत्ताधारक तसेच नळ संयोजनधारकांनी आपला कर वेळेत भरावा आणि कारवाई टाळावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.