नवी दिल्ली येथे सोमवारपासून सुरू झालेल्या जागतिक पुस्तक जत्रेच्या ‘इंग्रजी भाषा विभागा’त ‘केशव भिकाजी ढवळे’, ‘ज्योत्स्ना’ आणि ‘पॉप्युलर प्रकाशन’ हे तीन मराठी प्रकाशक सहभागी झाले आहेत. इंग्रजी भाषेत प्रकाशित केलेली आपली पुस्तके त्यांनी येथे मांडली आहेत.
ढवळे प्रकाशनाच्या कस्तुरी ढवळे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, यंदा आम्ही पहिल्यांदाच जागतिक पुस्तक जत्रेत सहभागी झालो आहोत. सार्थ ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, श्रीमद्भगवद्गीता, दासबोध आदी ग्रंथांचे आम्ही इंग्रजी भाषांतर प्रकाशित केले असून त्यांची ई-बुक्सही आम्ही ‘आयमस्ती डॉट कॉम’च्या सहकार्याने प्रकाशित केली आहेत. आमच्या या धार्मिक ग्रंथाना अमेरिका आणि अन्य देशांतूनही खूप मोठी मागणी आहे. तसेच अन्य विषयांवरील काही पुस्तकेही आम्ही इंग्रजीत प्रकाशित केली आहेत.
जागतिक पुस्तक जत्रेत देश-विदेशातील अन्य प्रकाशक, ग्रंथ विक्रेते सहभागी होत असतात. या निमित्ताने त्यांच्याशीही संपर्क होतो. धार्मिक-आध्यात्मिक ग्रंथांच्या माध्यमातून आपली भारतीय संस्कृती परदेशात पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठीच आम्ही आमचे ग्रंथ इंग्रजी भाषेत प्रकशित करायला सुरुवात केली असल्याचेही त्या म्हणाल्या.
ज्योत्स्ना प्रकाशनाचे विकास परांजपे यांनी सांगितले की, गेल्या १२-१४ वर्षांपासून आम्ही या पुस्तक जत्रेच्या इंग्रजी भाषा विभागात सहभागी होत आहोत. चित्रकलाविषयक आणि मुलांसाठीची अनेक पुस्तके आम्ही मराठीसह इंग्रजीतही प्रकाशित केली आहेत. पुंडलिक वझे, माधुरी पुरंदरे यांच्या इंग्रजी पुस्तकांनाही चांगली मागणी आहे.
पुस्तक जत्रेच्या निमित्ताने अन्य राज्ये तसेच परदेशातील ग्रंथविक्रेते, प्रकाशक यांची भेट होते. त्यांच्याशी संवाद साधला जातो. यातून नवीन ओळखीही होतात. आमच्या प्रकाशन संस्थेच्या इंग्रजी पुस्तकांनाही चांगली मागणी असल्याचा आमचा गेल्या काही वर्षांतला अनुभव आहे.
दरम्यान पुस्तक जत्रेच्या भारतीय भाषा विभागात मराठी प्रकाशक परिषद आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या माध्यमातूनही काही मराठी प्रकाशक-ग्रंथविक्रेते सहभागी झाले आहेत. नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर सुरू झालेली हा जागतिक पुस्तक जत्रा येत्या १० फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three marathi books in global book festival