* मैदानात बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याची शिवसेनेची मागणी
* काँग्रेसचे मौन, राष्ट्रवादी अनुकूल, मात्र क्रीडाप्रेमींचा विरोध
शिवाजी पार्क मैदानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यावरून वेगवेगळे मतप्रवाह उमटू लागले आहेत. मैदानातच शिवसेनाप्रमुखांचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केली असतानाच पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले नगरविकास खात्याचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी अनुकूल भूमिका घेतली. मैदानात स्मारक उभारण्यास परवानगी द्यायची झाल्यास शासनाला काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल व त्यातून न्यायालयीन लढाई होण्याची शक्यता आहे. मैदानावर खेळापेक्षा विविध पुतळे आणि स्मारकांमुळे शिवाजी पार्क मैदानाचे होणार तरी काय, असाच प्रश्न दादरकरांना पडला आहे.
शिवसेनाप्रमुखांवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देतानाच स्मारकाची मागणी पुढे येणार याची खूणगाठ शासकीय पातळीवर बांधण्यात आली होती. यामुळेच अंत्यसंस्काराला परावनगी द्यायची की नाही, यावर शासकीय पातळीवर बराच खल झाला. शिवाजी पार्क मैदानाशी शिवसेनाप्रमुखांचे असलेले अतूट नाते लक्षात घेता त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी भूमिका शिवसेना नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मांडली. शिवसेना शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेबांच्या स्मारकाकरिता आग्रही असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. शिवसेनेच्या वतीने अद्याप लेखी मागणी करण्यात आलेली नसली तरी नगरविकास खात्याचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी तशी मागणी झाल्यास विचार करू, असे सांगत सरकार अनुकूल असल्याचे संकेत दिले. सध्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेनेचे असलेले स्नेहाचे संबंध लक्षात घेता मुख्यमंत्रीही विरोधी भूमिका घेण्याची शक्यता फारच कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारील जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याची शिवसेनेची योजना आहे. शिवाजी पार्क मैदानात स्मारक उभारण्याकरिता कायदेशीर अडथळे येऊ शकतात. शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान असल्याची भूमिका यापूर्वी उच्च न्यायालयाने घेतली असल्याने त्यावर बांधकामास मनाई आहे. या मैदानात स्मारक उभारण्याकरिता वेगवेगळ्या कायद्यात बदल करावे लागतील व सारी प्रक्रियाच किचकट आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता शिवाजी पार्कपेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाशेजारील महापौर बंगल्याच्या दर्शनी भागातील जागेत शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. महापौर बंगल्याच्या समोरील भागात स्मारक उभारल्यास रस्त्यावरून ये-जा करता त्याचे सर्वसामान्यांना दर्शन होईल, असेही भुजबळ यांचे म्हणणे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी स्मारकाच्या विस्ताराकरिता सुमारे १२ एकर इंदू मिलच्या जागेची राज्य शासनाने केंद्राकडे मागणी केली आहे. ही जागा मिळण्याचा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. इंदू मिलच्या जागेत शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे स्मारक उभारावे, अशी दादरकरांची दबक्या आवाजात मागणी आहे. शिवाजी पार्क मैदान हे खेळांसाठी असल्याने खेळावर परिणाम होईल अशी कोणताही कृती करू नका, अशी क्रीडाप्रेमींची मागणी आहे. बाळासाहेब आज असते तरी त्यांनी खेळाचे मैदान अन्य कारणांसाठी वापरण्यास विरोध दर्शविला असता, अशीच प्रतिक्रिया क्रीडाक्षेत्रातून व्यक्त केली जाते.
संग्रहित लेख, दिनांक 20th Nov 2012 रोजी प्रकाशित
शिवाजी पार्कचे होणार काय?
* मैदानात बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याची शिवसेनेची मागणी * काँग्रेसचे मौन, राष्ट्रवादी अनुकूल, मात्र क्रीडाप्रेमींचा विरोध शिवाजी पार्क मैदानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यावरून वेगवेगळे मतप्रवाह उमटू लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-11-2012 at 05:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What about shivaji park