मालमत्तेच्या वादातून पत्नीनेच नवऱ्याचा खून आपल्या दिराच्या मदतीने केला असल्याची घटना टिटवाळा पोलिसांनी उघडकीस आणली आहे. अतिशय क्रूरपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणात दीर परवझे धुरू आणि मयताची पत्नी अतिया व अन्य दोन संशयित मारेकऱ्यांना अटक झाली आहे.
गेल्या पाच दिवसांपूर्वी टिटवाळ्यातील महादेव मंदिराजवळील नाल्यात एक मानवी मुंडके तरंगत असल्याचे आढळून आले होते. टिटवाळा पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता, दोन पिशव्यांमध्ये मयताच्या शरीराचे तुकडेही सोबत असल्याचे आढळून आले.
होते. अतिशय छिन्नविच्छिन्न झालेल्या या मृतदेहाचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. ही घटना घडली असताना टिटवाळा पोलिसांना बाजारपेठ पोलीस ठाण्यात मथर महम्मद अहमद धुरू ही व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.  
त्या माहितीच्या आधारे शोध घेतला असता पोलिसांनी कल्याणमधील दूधनाक्यावरील धुरू इमारतीत राहणाऱ्या मथरची पत्नी अतिया आणि भाऊ परवेझ यांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून मथरचा खून या दोघांनीच केल्याचे निष्पन्न झाले. परवेझ आणि अतिया या दीर-भावजयचे अनैतिक संबंध होते, अशीही माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली. मथरच्या नावाने कोटय़वधीची जमीन होती.
या मालमत्तेवरून मथर आणि आरोपींमध्ये वाद होत होते. त्या वादातूनच मथरचा काटा काढण्यासाठी त्याचा खून दोन मारेकऱ्यांना हाताशी धरून करण्यात आला आणि त्याचा मृतदेह टिटवाळ्यातील नाल्यात पुरावा नष्ट करण्यासाठी टाकून देण्यात आला होता, असे टिटवाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र नाईक यांनी सांगितले.