बलात्कार आणि विनयभंग यांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला असला तरी छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशाच प्रकारच्या दोन घटना देवनार परिसरात घडल्या असून संबंधित घटनांमधील आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी छेड काढण्यात आलेली एक मुलगी अल्पवयीन असून दुसरी परिचारिका आहे.
देवनार येथील बैंगणवाडी परिसरात एक १७ वर्षांची विद्यार्थिनी मैत्रिणीसह तिच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेली होती. त्या वेळी परवेझ शेख, जावेद शेख, मल्लिकार्जुन वाल्मीकी आणि रफीक खान यांनी अश्लील भाषेत शेरेबाजी करीत त्यांची छेड काढली. त्यानंतर या विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी परवेझ व मल्लिकार्जुन या दोघांना अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले. जावेद व रफिक हे दोघेही फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दुसऱ्या घटनेत बैंगणवाडी परिसरातीलच गौतमनगर परिसरात एका महिलेला अश्लील भाषेत शेरेबाजी करून त्रास देणाऱ्या जुबेर शेख याला पोलिसांनी अटक केली. ही महिला एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते. गुरुवारी ही महिला कामावरून घरी येत असताना जुबेरने तिला रस्त्यात गाठून हे कृत्य केले. त्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली व पोलिसांनी जुबेरला अटक केली. त्यालाही शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले.