सीताबर्डी मुख्य मार्गावरील लोहापुलाजवळ राहणाऱ्या एका आरोपीने घरगुती वादातून पत्नीवर घरातच रॉकेल टाकून गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास पेटवून दिले. पत्नीला गंभीर अवस्थेत उपचाराकरिता मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
अमित राधेश्याम शर्मा ( ३७, रा. सीताबर्डी मेन रोड, लोहापुलजवळ) असे आरोपी पतीचे नाव असून पूजा उर्फ अलका अमित शर्मा ( २६) असे जखमी पत्नीचे नाव आहे. १२ नोव्हेंबरच्या सकाळी ९ ते ९.३० च्या सुमारास पूजा दिवाळीचा प्रसाद वाटून घरी आली होती. अमितने पूजाला तिचा फोन आल्याचे सांगत वरच्या माळ्यावरून खालच्या रुममध्ये बोलावले. तुझ्यामुळे वारंवार घरात भांडण होत असल्याने आता तुझा खेळ संपवत असल्याचे धमकावत पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. खोलीचे दार बंद करीत पती मुलीला सोबत घेऊन निघून गेला.
आगीच्या थारोडय़ात सापडलेल्या पत्नीने आरडा- ओरड केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर भाजलेल्या पूजाला मेयोत उपचाराकरिता हलवले. पूजाची प्रकृती गंभीर असून मेयोतील तज्ज्ञ डॉक्टर तिच्यावर उपचार करीत आहेत. पूजाच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी आरोपी अमित शर्मा याच्यावर ३०७ भादंवि, जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.