मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकल्प प्राधान्यांच्या यादीत पहिल्या दहा क्रमांकांत असलेल्या सिडकोच्या नयना प्रकल्पाचे भवितव्य हे भ्रष्टाचाराच्या गाळात रुतलेल्या बाळगंगा धरणाच्या पाण्यावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. सिडकोच्या वतीने विकास आराखडा तयार करण्यात येणाऱ्या नयना प्रकल्पातील रहिवाशांसाठीच्या पाण्याची तरतूद या धरणाच्या उभारणीतून करण्यात आली आहे. त्यासाठी सिडकोने कोकण पाटबंधारे विभागाला ४५० कोटी रुपये अग्रीम रक्कम दिली आहे. त्यामुळेच धरणाचे काम न थांबविता त्यासाठी दुसरा कंत्राटदार नेमण्यात यावा अशी सूचना सिडकोने केली आहे.
पाटबंधारे विभागातर्फे पेण तालुक्यातील बाळगंगा नदीवर बाळगंगा धरण बांधण्यात येत आहे. या धरणाचे काम सध्या भष्टाचाराच्या गर्तेत गटांगळ्या खात असल्याने लाचलुचपत विभागाने कंत्राटदाराला व काही अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्यामुळे धरणाचे काम ठप्प झाले आहे. राज्य शासनाच्या सूचनेवरून सिडकोने या प्रकल्पाला ४५० कोटी रुपये अग्रीम रक्कम दिली आहे. या बदल्यात सिडकोच्या खारघर, द्रोणागिरी, उलवा, कामोठे, नवीन पनवेल या भागाला या धरणाचे पाणी तर दिले जाणार आहेच, पण नयना प्रकल्पही या पाण्यावर अवलंबून आहे. सध्या सिडकोला नवी मुंबई पालिकेच्या मोरबे धरणातून ५५ दशलक्ष लिटर पाणी घेऊन या उपनगरांना द्यावे लागत आहे. सिडकोच्या नयना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात गुजरात पॅटर्ननुसार खूप मोठय़ा प्रमाणात गृहनिर्मिती होणार आहे. या घरांमध्ये राहण्यास येणाऱ्या रहिवाशांसाठी सिडकोने पाण्याची तरतूद करण्यास सुरुवात केली असून बाळंगगा धरण हे त्यापैकी एक होते. पनवेल तालुक्यातील कोंढाणे धरणाचाही विचार केला जात आहे, पण या धरणाची क्षमता कमी आहे. उरण भागातील काही गावांतील रहिवासी आता पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. त्यामुळे नयना प्रकल्पातील २७० गावांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा आणि नव्याने निर्माण होणाऱ्या वसाहतींचे पाणीसंकट दूर व्हावे यासाठी रायगड जिल्ह्य़ात जास्तीत जास्त धरण बांधण्याचा चितळे समितीचा प्रस्ताव आहे. त्यानुसार सिडकोने हेटवणे धरणाची याअगोदर निर्मिती केली आहे. बाळगंगा धरणाची क्षमता ३५० दशलक्ष लिटर आहे, पण हे धरण आता भ्रष्टाचारात अडकल्याने त्याचे काम लांबणीवर पडले आहे. पाण्याअभावी नयना प्रकल्पाच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे हे धरण लवकरात लवकर बांधण्यात यावे, असा सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांचा आग्रह आहे.