दुकानाबाहेरील पोटदुकानांकडे नवी मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुकाराम मुंढे यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात मोकळा श्वास घेऊ लागलेले पदपथ आणि दुकानांबाहेरील सामासिक जागांची (मार्जिनल स्पेस) पुन्हा घुसमट होऊ लागली आहे. बेलापूरपासून दिघ्यापर्यंत प्रत्येक विभागातील सामासिक जागांवर पोटदुकानदारांनी डल्ला मारला आहे.

नवी मुंबईतील आठही विभाग कार्यालयांच्या हद्दीतील व्यावसायिकांनी अनेक ठिकाणी दुकानाबाहेर दुकान थाटले आहे. दुकानाबाहेर सामान ठेवणे, बाहेरच्या मोकळ्या जागेत पत्रा लावून ती जागा दुसऱ्या छोटय़ा व्यावसायिकाला भाडय़ाने देणे, अशा पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालणाऱ्या प्रकारांवर मुंढे यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात चाप लावला होता.

त्यामुळे सर्व पदपथ मोकळे झाले होते आणि अनेक मोकळ्या जागा दिसू लागल्या होत्या. ऐरोलीमध्ये दुकानातील घरात आग लागून दोघींना जीव गमावावा लागल्यामुळे दुकानांच्या जागांचा गैरवापर किंवा वापर बदल हे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नवी मुंबईत अनेक ठिकाणी दुकानाबाहेर बेकायदा फेरीवाले आहेत. गॅसचा वापर करून खाद्यपदार्थाच्या गाडय़ा लावण्यात आल्या आहेत. चहाच्या टपऱ्याही आहेत. पदपथ अडवण्यात आल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे.

आयुक्त रामास्वामी एन. यांनीही सुरुवातीला अतिक्रमणांवर मोठय़ा प्रमाणात धडाकेबाज कारवाई केली परंतु आता पुन्हा सामासिक जागांचा गैरवापर होऊ  लागला आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी तात्पुरते गुंडाळलेले शेड पुन्हा लावले आहेत. वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, सीवूड्स, बेलापूरसह सर्वच विभागांत कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे.

सायंकाळ होताच मोकळ्या जागा अडवल्या जात आहेत. दुकानदारही दुकानातील बराच माल पुन्हा बाहेर ठेवू लागले आहेत. पोटभाडेकरूकडून चांगले भाडे मिळत असल्याने जागा अडवून एकाच दुकानदाराने दोन-तीन पोटभाडेकरू ठेवल्याचे प्रकारही पाहायला मिळतात.

३ ते ७ हजार भाडे

वाशी रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या किऑस्कमध्ये जे व्यवसाय केले जातात तिथे मोठय़ा प्रमाणात गॅसचा वापर होतो. पोटव्यवसाय थाटले आहेत. एका छोटय़ा पानटपरीसाठी दरमहा ७ ते ८ हजार रुपये भाडे घेतले जाते. विविध विभागांत  दुकानाबाहेरच्या पोटव्यावसायिकांकडून ३ ते ७ हजार रुपये पोटभाडे वसूल केले जात आहे.

शहरातील सामासिक जागेचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे फेरीवाले व व्यावसायिकांनी या जागांचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येत आहे. नुकतीच वाशी सेक्टर १५ व १६ येथे कारवाई करण्यात आली.    – महेंद्रसिंग ठोके, विभाग अधिकारी, वाशी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal construction in navi mumbai