पनवेलमधील पोलीस ठाण्याचे नाव एकीकडे आणि त्या पोलीस ठाण्याच्या इमारतीचा पत्ता दुसरीकडे अशी अवस्था असल्याने सामान्य तक्रारदार संभ्रमात पडण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. पनवेल शहर वाहतूक शाखा, खांदेश्वर आणि नवीन पनवेल पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यांची ही व्यथा आहे. शहर नियोजनाच्या अभावामुळे हा घोळ झाल्याचे पोलीस विभागातून सांगितले जाते. सिडको आणि गृह विभागाने जागरूकता दाखविल्यास हा प्रश्न निकाली निघेल, अशी अपेक्षा आहे.
पनवेल तालुक्यामध्ये सात पोलीस ठाणी आहेत. त्यापैकी वाहतूक विभागाचा कारभार हा स्वतंत्रपणे चालतो. त्यासाठी पोलीसबळही स्वतंत्र आहे. हक्काची जागा नसल्याने पनवेल शहर वाहतूक शाखेचा कारभार वर्षांनुवर्षे रस्त्याकडेला असणाऱ्या चिंचोळ्या जागेवर सुरू आहे. विशेष म्हणजे पनवेल शहराच्या वाहतूक कार्यक्षेत्रासाठी असलेले हे पोलीस ठाणे कळंबोलीच्या हद्दीत आहे. या पोलीस ठाण्यापासून कळंबोली वाहतूक पोलीस ठाणे शंभर मीटरपेक्षा कमी अंतरावर आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पनवेल शहरामध्ये दोषी वाहनचालकांची गाडी पकडल्यानंतर संबंधित वाहनचालकाला दंडाची रक्कम भरण्यासाठी सुमारे पन्नास रुपये रिक्षासाठी खर्च करून कळंबोली येथे जावे लागते. या पोलीस ठाण्यात तैनातीला असणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही हीच व्यथा आहे. हजेरीसाठी कळंबोलीजवळील पोलीस ठाण्यात यायचे, त्यानंतर कामासाठी पनवेल शहरात जायचे असा द्राविडी प्राणायाम या पोलिसांना रोज करावा लागतो. कर्मचाऱ्यांप्रमाणे या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांनाही दिवसभर पनवेल शहरात गस्त घालायची आणि त्यानंतर कागदोपत्री कारवाईसाठी पुन्हा कळंबोलीजवळील पोलीस ठाणे गाठायचे असा प्रकार करावा लागतो. पनवेल शहर वाहतूक ठाण्याची इमारत पनवेलमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असल्यास त्याचा लाभ सामान्यांसह सर्व पोलिसांना होईल. पनवेल शहर वाहतूक शाखेने सिडकोकडे जागा मिळण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. परंतु या परिसराच्या नियोजन आराखडय़ात वाहतूक विभागासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या जागेचे नियोजन केलेले दिसत नाही.
सायन-पनवेल महामार्गावरील गार्डन हॉटेलसमोरील सिडकोची मोकळी जागा मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली आहे. मात्र त्यासही सिडकोकडून प्रतिसाद मिळालेला नाही. नवीन पनवेल पोलीस ठाण्याचीही हीच गत आहे. या पोलीस ठाण्याचे नाव नवीन पनवेल पोलीस ठाणे असताना या पोलीस ठाण्याकडे पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांचा कार्यभार आहे. मात्र या पोलीस ठाण्याची इमारत पनवेल शहरात वसविली असल्याने सुकापूर गावापुढील नेरे, वाकडी या गावांसह वावंजा आणि विचुंबे ही गावे ते कर्नाळा त्यानंतर साई अशी गावे या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मोडतात. या परिसरातील तक्रारदारांना फिर्याद नोंदविण्यासाठी पनवेल शहरात धाव घ्यावी लागते. नवीन व्यक्तीला या पोलीस ठाण्याचा पत्ता विचारल्यास ते नवीन पनवेलकडे बोट दाखवितात. या पोलीस ठाण्याचे नाव पनवेल तालुका पोलीस ठाणे असे असावे यासाठी पोलीस विभागाने गृहविभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी पोलीस आयुक्तांकडे पाठविलेल्या पत्रव्यवहारामध्ये नवीन पनवेल पोलीस ठाण्याच्या नवीन नामकरणासोबत खांदेश्वर पोलीस ठाण्याचे नाव नवीन पनवेल पोलीस ठाणे करावे असे सूचित केले आहे. हा प्रस्ताव आयुक्तांनी शासनमान्यतेसाठी गृह विभागाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले.