सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा हातात येणाऱ्या टूथपेस्टपासून ते रात्री झोपेपर्यंत वापरात येणाऱ्या सगळ्या उत्पादनांचे ट्रेंड सातत्याने बदलत असतात. या बदलणाऱ्या लाटांची आता आपल्याला इतकी सवय झाली आहे की खूप काळापर्यंत सातत्य टिकवून असलेले एखादे उत्पादन विरळाच. विहिरीच्या रहाटाप्रमाणे सतत नव्या, जुन्या पद्धतींचे आणि त्या अनुषंगाने उत्पादनांच्या बदलणाऱ्या ट्रेंडसवर बाजारपेठेचे चक्र सुरू असते. माणसांचा हा नव्याचा सोस पशू उत्पादनांच्या बाजारपेठेतही दिसून येतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हर्बल उत्पादनांची लाट

सध्या पशू उत्पादनांच्या बाजारपेठेत नैसर्गिक सामग्रीपासून तयार केलेल्या (हर्बल) उत्पादनांचा ट्रेंड दिसून येतो. टूथपेस्ट, शाम्पू, पावडर, साबण, कीटक घालवणारे फवारे, दरुगधी येऊ नये म्हणून वनस्पतींच्या वासाचे फवारे (डीओ, पफ्र्युम्स) अशी उत्पादने बाजारात आहेत. त्याचबरोबर कृमीनाशक औषध, प्राण्यांना भूक लागावी म्हणून, पचन चांगले होण्यासाठी, पित्त वाढू नये म्हणून, त्वचेला होणारा बुरशीचा संसर्ग, त्वचा रोग, केस गळणे, जखमांवरील मलम अशी औषध स्वरूपातील उत्पादनेही बाजारात आहेत. आठ ते दहा भारतीय कंपन्यांची उत्पादने पशूसाहित्य विकणाऱ्या दुकानांमध्ये दिसून येतात. संकेतस्थळांवर १५ ते २० भारतीय कंपन्यांची उत्पादने आहेत. या उत्पादनांसाठी पशू पालकांकडून वाढणाऱ्या मागणीमुळे आता काही परदेशी कंपन्यांनीही ‘हर्बल’ उत्पादनांची निर्मिती सुरू केली आहे. नैसर्गिक वास, चवी यांमुळे प्राण्यांसाठी ही उत्पादने अधिक योग्य ठरतात. त्याचे दुष्परिणाम होण्याचे प्रमाण खूप कमी आहे, असे मुद्दे या उत्पादनांच्या विक्री वाढवण्यासाठी कंपन्यांनी आखलेल्या आराखडय़ातील प्रमुख मुद्दे आहेत. पशू पालकांनाही सध्या या उत्पादनांनी आकर्षित केले आहे. पालक हर्बल उत्पादनांबाबत आवर्जून विचारणा करत असल्याचे संतोष जाधव या विक्रेत्यांनी सांगितले. ‘या उत्पादनांच्या वापराचे फारसे अपाय होत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे काही जुजबी जखमा असतील, प्राण्यांच्या स्वच्छतेबाबत काही उत्पादने हवी असतील, तर आम्हीही हर्बल उत्पादने सुचवतो,’ असे जाधव यांनी सांगितले.

बदलांची सुरुवात

पाळीव प्राण्यांमध्ये अन्नासाठी वापरले जाणारे प्राणी म्हणजे, गाई-गुरे, शेळ्या-मेंढय़ा, कोंबडय़ा यांच्यावर उपचार करण्यासाठी परिसरातील वनस्पतींचा वापर पूर्वीपासून करण्यात येतो. मात्र २००० नंतर आयुर्वेदिक किंवा हर्बल उत्पादनांमध्ये आघाडीवर असलेल्या, बेंगळूरु येथील एका भारतीय कंपनीने श्वान आणि मांजरांसाठी आयुर्वेदिक उत्पादने बाजारात आणली. प्राण्यांची काळजी घेणाऱ्या उत्पादनांच्या भारतीय बाजारपेठेचे चित्र बदलू लागले. राज्यात २००९ मध्ये पसरलेल्या स्वाइन फ्लूच्या प्रादुर्भावानंतर उपचारांसाठी नाही मात्र प्राण्यांची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक उत्पादनांचा वापर वाढू लागला. तोपर्यंत प्राण्यांचीही काळजी घ्यावी लागते याबद्दल जागरूकता झाली होती, पशू उत्पादने गल्लोगल्लीतील दुकानांमध्ये मिळू लागली होती. घरातील श्वानांना किंवा मांजरांना या आजाराचा प्रादुर्भाव होईल का अशी चिंता पशू पालकांना सतावत होती. घरातील प्राण्यांना हा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तुरळक असली तरी कोणतेही विषाणूजन्य आजार प्राण्यांमध्ये पसरू नयेत यासाठी काही कंपन्यांनी हर्बल उत्पादने बाजारात आणली. त्याची माध्यमांमधून जाहिरातबाजी झाली नसली तरी पशूवैद्य किंवा पशू उत्पादने विकणाऱ्या दुकानांतून त्या वेळी या जाहिराती दिसत होत्या किंवा दुकानदारांकडून ही औषधे सुचवली जात होती.

होमिओपॅथी, आयुर्वेदिक उपचार

माणसांवर उपचार करण्यासाठी वैद्यकशास्त्रात अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद अशा प्रमुख तीन शाखा दिसतात. प्रत्येक उपचार पद्धतीचे आपले तत्त्वज्ञान आहे आपापसात उपयोग, परिणाम अशा मुद्दय़ांवर मतभेदही आहेत. ‘व्हेटर्नरी सायन्स’ हा पशूवैद्य होण्यासाठीचा अभ्यासक्रम प्रामुख्याने ‘मॉडर्न मेडिसिन्स’वर आधारलेला आहे. प्राण्यांवर उपचार करण्यासाठी घरगुती औषधे, वनस्पतींचा वापर पूर्वीपासून करण्यात येतो. मात्र आता प्राण्यांसाठी होमिओपॅथी, आयुर्वेद उपचार पद्धतींचा वापर करणारी रुग्णालये सुरू झाली आहेत. होमिओपॅथीचे उपचार करणाऱ्या ‘ब्रॅड’ झालेल्या एका रुग्णालयाने आता प्राण्यांवर होमिओपॅथिक उपचार करण्यासाठी स्वतंत्र रुग्णालय उभे केले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतही त्याच्या शाखा सुरू झाल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी प्राण्यांसाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत गुरांवरील उपचारांसाठी आयुर्वेदाचा वापर करण्यापलीकडे जाऊन श्वान आणि मांजरांसाठीही या उपचार पद्धतीचा वापर करण्यावर आवर्जून चर्चा झाली. प्राण्यांसाठीही ‘मॉडर्न मेडिसिन’व्यतिरिक्त इतर पद्धतींच्या उपयोगाबाबत पशूवैद्यकांमध्ये काही प्रमाणात मतभेदही असले तरी पशू उत्पादन आणि सेवांच्या बाजारपेठेत एका नव्या प्रवाहाचा उगम झाला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New methods of animal treatment