यास्मिन शेख

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुढील वाक्य माझ्या वाचनात आले, ते असे – ‘भारत-पाकिस्तान- सीमेवर एका पाकिस्तानी घुसखोराला काल पहाटे अटक करण्यात आले.’ या वाक्यरचनेत ‘.. घुसखोराला काल पहाटे अटक करण्यात आले.’ यातील ‘अटक करण्यात आले.’ यात चूक आहे. निर्दोष वाक्यरचना अशी आहे – ‘..घुसखोराला काल पहाटे अटक करण्यात आली.’ आली हे क्रियापद ‘अटक’ या स्त्रीलिंगी नामाप्रमाणे हवे. ‘त्याला’ हे या वाक्यात कर्म आहे. ‘शिपायांनी’ हा वाक्याचा कर्ता अध्याहृत आहे. हा शब्द ‘नी’ हा तृतीयेचा प्रत्यय लागून सिद्ध झाला आहे.

कोणाला? याचे उत्तर ‘घुसखोराला’ असे आहे. घुसखोर या शब्दाला द्वितीयेचा प्रत्यय लागून घुसखोराला हा शब्द सिद्ध झाला आहे. काय केलं? याचे उत्तर ‘अटक केली.’ हे आहे. ‘अटक केले’ किंवा ‘अटक करण्यात आले.’ या प्रकारची सदोष वाक्यरचना करू नये. असेच एक सदोष वाक्य वाचले. ते असे -‘आपले अधिकांश सिनेमे समाजाच्या लघुत्तम साधारण विभाजकाला केंद्रबिंदू ठरवून बेतलेले असतात.’

या वाक्यातील लघुत्तम हा शब्द सदोष आहे. (या शब्दाची फोड अशी होईल- लघुत्+तम= लघुत्तम हे रूप चुकीचे आहे. बरोबर शब्द आहे – लघुतम – लघु+तम= लघुतम. गणितातील दोन संज्ञा अशा आहेत – महत्तम साधारण विभाजक आणि लघुतम साधारण विभाजक. महत्तम हे शब्दाचे लेखन बरोबर आहे. फोड करू या – महत् तम – महत्तम. या उच्चाराला अनुसरून लघुत्तम असा उच्चार आणि उच्चाराप्रमाणेच ‘लघुत्तम’ असे लेखन केलेले आढळते. या दोन्ही संज्ञा गणितातील आहेत. त्यांचे अर्थ असे – महत्तम साधारण विभाजक (संक्षिप्त रूप- म.सा.वि.) अर्थ- दिलेल्या सर्व संख्यांना नि:शेष भाग जाईल अशी मोठय़ात मोठी संख्या.

लघुतम साधारण विभाजक (संक्षिप्त रूप- ल.सा.वि.) अर्थ – ज्या संख्येला दिलेल्या सर्व संख्यांनी नि:शेष भाग जाईल अशी लहानात लहान संख्या. गणितातील या संज्ञाचा वापर मराठीतील विधानामध्ये, इतर विषयांवरील लेखनामध्ये केल्यास त्या संज्ञेमुळे वाक्याचा अर्थ समजणे मला  तरी कठीण वाटते, अशा (अर्थाच्या दृष्टीने अतिशय अवघड वाटणाऱ्या) संज्ञा गणिताव्यतिरिक्त इतर विषयांसाठी योजणे टाळावे, असे वाटते.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhashasutra innocent syntax verb in a sentence ysh