कुतूहल : विजेला जमिनीवर आणणारा पतंग

विजेचे स्वरूप स्पष्ट झाल्यानंतर फ्रँकलिन यांनी १७५३ साली विद्युतनिवारकाची कल्पना मांडली.

कुतूहल : विजेला जमिनीवर आणणारा पतंग
(संग्रहित छायाचित्र)

उपजत जिज्ञासावृत्ती आणि कुतूहल या गुणांमुळे मानवाने निसर्गात घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच अनेक शोध लागले, कितीतरी कोडी उलगडण्यास मदत झाली.

विजेचे दुर्वाहक असलेले दोन विशिष्ट पदार्थ (उदाहरणार्थ, काचेचा दांडा आणि रेशमी कापड) एकमेकांवर घासल्याने निर्माण होणारी स्थितिक विद्युत आणि आकाशात कडाडणारी वीज समान आहेत का, असा प्रश्न अठराव्या शतकाच्या मध्यावर अमेरिकेतील संशोधक बेंजामिन फ्रँकलिन यांना पडला होता. हे कोडे उलगडण्यासाठी त्यांनी एक प्रयोग केला. त्यांनी सीडर लाकडाच्या पातळ पट्टय़ा आणि रेशमी कापड यांचा वापर करून एक पतंग तयार केला. पतंगाच्या वरच्या टोकाला एक धातूची तार बसवली आणि या तारेला पतंगाची दोरी बांधली. दोरीच्या दुसऱ्या टोकाला त्यांनी एक लोखंडी किल्ली बांधली. किल्लीला एक कोरडी रेशमी फीत बांधली. गडगडणाऱ्या काळय़ा ढगांनी आकाशात गर्दी केलेली असताना फ्रँकलिन यांनी तो पतंग आकाशात उंच उडवला. ढगांत असलेला विद्युतप्रभार या भिजलेल्या पतंगात आणि त्यानंतर धातूच्या तारेतून दोरीच्या दुसऱ्या टोकापर्यंत उतरला. दोरीवरचे सूक्ष्म धागे विद्युतप्रभारामुळे उभे राहत असल्याचे दिसताच, त्यांनी आपले बोट लोखंडी किल्लीजवळ आणले आणि विजेचा जाणवण्याइतका जोरदार झटका त्यांना बसला. आकाशात उडणाऱ्या त्या पतंगाने विजेला जमिनीवर आणले होते. या प्रयोगातून ढग हे विद्युतप्रभारित असल्याचे स्पष्ट झाले.

त्याचप्रमाणे घर्षणजन्य विद्युत ज्यात साठवता येते, त्या लेडन किंवा क्लेस्टीयन बरणीचा विद्युतवाहक दांडा या किल्लीला टेकवल्याबरोबर ती बरणी विद्युतभारित झाली. या प्रयोगावरून फ्रँकलिन यांनी दाखवून दिले की, आभाळात कडाडणारी वीज आणि प्रयोगशाळेत निर्माण केली जाणारी घर्षणजन्य स्थितिक विद्युत यांमध्ये काहीच फरक नाही.

विजेचे स्वरूप स्पष्ट झाल्यानंतर फ्रँकलिन यांनी १७५३ साली विद्युतनिवारकाची कल्पना मांडली. विद्युतनिवारक किंवा तडितरक्षक म्हणजे तांब्याची एक लांब पट्टी असते. इमारतीच्या सर्वात उंच भागात ही पट्टी बसवली जाते. पट्टीचे वरचे टोक अणकुचीदार असते. दुसऱ्या टोकाला तांब्याची जाड तार जोडून तारेचे मोकळे टोक जमिनीत पुरलेल्या मृदू लोखंडाच्या जाड पत्र्याला जोडलेले असते. यामुळे वादळी परिस्थितीत जर वीज कोसळली तर विजेचे तांब्याच्या तडितरक्षकाद्वारे जमिनीत सहजपणे वहन होते आणि विजेपासून इमारतीचे रक्षण होतो. फ्रँकलिन यांनी सुचवलेल्या तडितरक्षकाचा लवकरच सर्वत्र वापर सुरू झाला.

हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भाषासूत्र : तद्भवाचे तटी..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी