पृथ्वीवरील सागरी जलाशयामधील सर्वात मोठा सस्तन प्राणी म्हणजे ब्लू व्हेल अर्थातच निळसर देवमासा होय. अंदाजे १०० फूट लांब आणि २०० टन वजन (३३ हत्तींचे एकत्रित वजन) हे त्याच्या देहाची अवाढव्यता सांगण्यास पुरेसे आहे. वर्तमानकाळामधील या नैसर्गिक घटकांची माहिती मिळाल्यावर साहजिकच मनात कुतूहल निर्माण होते ‘‘यापेक्षाही कुणी मोठे असेल का? निदान भूतकाळामध्ये तरी.’’ आज विज्ञानाने भूतकाळामधील लपलेले हे गूढ उकलले आहे. मेसेझोईक कालखंडामध्ये जेव्हा पृथ्वीच्या भूपृष्ठावर ‘डायनोसार’ या महाकाय प्राण्यांचे राज्य होते तेव्हा सागरामध्ये ‘इचथ्योसोर’ हे देवमाशापेक्षाही महाप्रचंड जलचर मुक्तपणे विहार करत होते. इंग्लंडमधील फेब्रुवारी २०२१च्या उत्खननामध्ये सापडलेले या सागरी प्राण्याचे सहा फूट लांबीचे आणि एक टन वजनाचे डोक्याचे हाड आणि इतर जीवाश्म आपणास जगामधील सर्वात मोठय़ा लॉस एंजलिस शहरामधील नैसर्गिक ऐतिहासिक संग्रहालयात पाहावयास मिळतात. जीवाश्म तज्ज्ञ लार्स श्मिट्झ यांचा या प्राण्याच्या जीवाश्मांचा वैज्ञानिक अभ्यास दर्शवितो की यांच्यामध्ये पोहण्यायोग्य शरीराची रचना आणि कल्ले होते. डॉ. मार्टिन सॅण्डर हे जर्मनीमधील बॉन विदयापीठातील जीवाश्म शास्त्रज्ञ म्हणतात की ‘इचथ्योसोर’ हा जलचर कुठल्या तरी अज्ञात सरिसृपापासून विकसित झाला असावा. त्या वेळी तो हवेद्वारे श्वसन करत असावा. नंतर मात्र या प्राण्याने २४६ दशलक्ष वर्षांपूर्वी महासागरामध्ये प्रवेश केला असणार. अमेरिकेमधील नेवाडा राज्यातील आगस्टा पर्वतरांगांमध्ये पसरलेल्या प्रचंड कातळामधून या प्राण्याचे नंतर विविध जीवाश्म मिळाले, त्यामध्ये डोक्याची कवटी, पाठीचा कणा, खांदे, पुढील कल्ले यांचा अंतर्भाव होता आणि हे सर्व अवशेष उत्तम अवस्थेत होते. हा कालखंड २४७.२ ते २३७ दशलक्ष वर्षांपूर्वीचा म्हणजे मध्य ट्रियास्सिकमधील असावा. जीवाश्मात आढळलेल्या त्याच्या जबडय़ामधील दात कोनाकार आकाराचे आहेत; यावरून हा महाप्रचंड प्राणी, इतर मासे तसेच सरिसृप कुळामधील म्हणजे मगर, सुसर यांसारख्या जलचरांच्या पिल्लांची शिकार करून त्यांचा आपल्या आहारात समावेश करत असावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वी निसर्गाचा अभ्यास करत असताना विज्ञानाने सर्वात लहान प्राणी तर शोधलाच, पण आत्तापर्यंतच्या इतिहासात ‘मीच सर्वात मोठा’ असे म्हणणाऱ्या देवमाशाचे गर्वहरण करून ‘इचथ्योसोर’ला त्यापेक्षा मोठा ठरवून स्वत:चे मोल सिद्ध केले, फक्त हा भूतकाळ म्हणजे पृथ्वीवरील उलथापालथीचा काळ होता एवढेच.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org   

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal aquatic on earth marine large mammals blue whale devmasa ysh