भाषासूत्र : सुजले भूत कोडवाळय़ास राजी

फक्त एक नारळ आणि तुमची मुलगी सन्मानाने मागायला आम्ही आलो आहोत. दुसरे आम्हाला काही नको.’

भाषासूत्र : सुजले भूत कोडवाळय़ास राजी
(संग्रहित छायाचित्र)

डॉ. माधवी वैद्य

एखाद्या व्यक्तीला जर भूतबाधा झाली तर त्याचे भूत उतरवण्यासाठी त्याच्या आवडीची किंवा तो मागणी करीत असलेली वस्तू त्याच्यावरून उतरवून टाकण्यात येते. अशा वेळी ते भूत कशाची मागणी करेल आणि ती मागणी आपल्याला पूर्ण करता येईल की नाही याबद्दल आपल्या मनात जरा भीती असते. पण ते भूत भुकेने फारच व्याकुळले असेल तर अगदी साधी गोष्ट मागूनही मोकळे होते. आणि आपल्याला एक सुखद धक्का बसतो.

कोडवाळ म्हणजे कडबोळे. समजा त्याची क्षुधा कडबोळे देऊनच भागली तर? तर किती सुटका झाल्यासारखे वाटत असेल, असा या म्हणीचा भावार्थ आहे. रमाने स्वत:चे लग्न स्वत:च ठरवले होते. त्यामुळे घरच्या लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. म्हणजे चारपाच घरांचे उंबरठे झिजवा आणि तिच्यासाठी नवरा शोधा हा व्याप आता करायला लागणार नाही या विचाराने तिचे आई-वडील सुखावले होते.

त्याच्या घरची परिस्थिती तर खूपच चांगली होती. पण लग्नाची बोलणी कशी होतील? त्यांच्या मागण्या अव्वाच्या सव्वा असतील तर आपल्याच्याने निभावेल ना? या विवंचनेत असतानाच मुलाच्या वडिलांचे शब्द कानी आले, ‘रमाचे बाबा! आम्हाला तुमची मुलगी, रमा खूप आवडली आहे बरं का! ती आमच्या घरात सुख, समाधान आणि शांती आणेल. खात्री आहे मला. अहो!

लग्नाची बोलणी, देणे घेणे, असले काही बोलायचे नाही आम्हाला. फक्त एक नारळ आणि तुमची मुलगी सन्मानाने मागायला आम्ही आलो आहोत. दुसरे आम्हाला काही नको.’ सर्वचजण त्यांचे बोलणे ऐकून थक्कच झाले. काय बोलावे कळेना. बैठकीची बोलणी अशाप्रकारे सुखासमाधानात झाली. सगळे परतल्यावर रमाची आजी सगळय़ांना म्हणाली, ‘बघा ! झालं ना सगळं व्यवस्थित?

उगाचच काळजी करत होतात. म्हणतात ना, सुजले भूत आणि कोंडवाळय़ास राजी तशातली गत!’

madhavivaidya@ymail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कुतूहल : आला आला सुगंध मातीचा..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी