डॉ. माधवी वैद्य

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नानीचा सहस्र चंद्रदर्शनाचा सोहळा साजरा करण्याचे तिच्या नातवंडांनी ठरवले होते. घरात त्याचीच लगबग सुरू होती. नानीने आधी तिच्या नातवंडांनी घातलेल्या या घाटाला काही संमती दिली नव्हती. तिला वाटत होते, आपण ८० वर्षे जगलो हे काही आपले कर्तृत्व म्हणायचे का? जंगलात नाही का झाडे वाढत, तसे वाढलो आपण! आपल्या हातून जन्माचे सार्थक होईल असे काम काही होऊ शकले का? तर तसेही काही झाले नाही.

जसे दिवस पुढे पुढे जात होते, तसे आपले आयुष्यही पुढे पुढे जात होते. जसे आपल्या आयुष्यात प्रसंग येत होते तसे आपण त्यांना सामोरे जात होतो. आता सर्वाच्याच आयुष्यात हा सहस्र चंद्रदर्शनाचा सोहळा येतो, कारण आयुर्मान वाढले आहे. इतके मात्र खरे की या मिळालेल्या दीर्घ आयुष्यात आपण अनेक उतार- चढाव पाहिले.

लग्न झाले तेव्हा अगदी पालखी, घोडे दारी असण्यासारखी आपली सांपत्तिक स्थिती होती. काय थाट होता संसाराचा! गाडी घोडे, घरी नोकर चाकर, आचारी पाणके, कामाला भरपूर गडी माणसे, घरी गोडाधोडाची नुसती रेलचेल! उंची वस्त्रे, दागदागिने, हौसमौज करून झाली. सर्व काही भोगून झाले. पण लक्ष्मी चंचल असते ना! ती जोवर घरात नांदते तोवर ठीक. तिची लहर फिरली की तेल गेले, तूप गेले अन् हाती धुपाटणे आले असेच म्हणायची वेळ येते ना! तेही दिवस आले. त्यानंतरचा काळ मात्र कसोटीचा आला. तोही निभावून नेला. नानींना वाटले आता गाडी परत एकदा रुळावर आली आहे. नातवंडांना वाटते आहे म्हणून त्यांनी एवढा मोठा घाट घातला आहे, त्याला नको कसे म्हणू ? ‘बुगडय़ा गेल्या पण भोके उरली आहेत’ इतके मात्र खरे !madhavivaidya@ymail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Useful phrases in marathi phrases of the marathi language marathi sentences zws