संगीत, स्वरसाधना, सरस्वती, आणि हृदयाचा ठाव घेणारी गाणी अशा शब्दांची विचारणा झाली की, ही सारी शोधमोहिम एकाच नावावर येऊन थांबते. ते नाव म्हणजे लता मंगेशकर. लतादीदी म्हणजे भारतीय चित्रपट संगीत आणि एकूणच संगीत विश्वाला लाभलेली एक दैवी देणगी आहे असेच म्हणावे लागेल. कुटुंबातूनच संगीताचा वारसा लाभलेल्या लतादीदींनी जवळपास सहा दशकांपेक्षा जास्त काळ संगीतक्षेत्रामध्ये आपले योगदान दिले आहे. गायकीचा वारसा असलेल्या आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडामध्ये लतादीदी सर्वात थोरल्या. लतादीदींचा आज ८७ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशी प्रत्येकजण त्यांना शक्य त्या परिने शुभेच्छा देत आहे. अशा या स्वरसम्राज्ञीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याच्या जीवनातील काही क्षणांवर टाकलेला हा धावता दृष्टीक्षेप… -
भारतीय संगीतातील योगदानाबद्दल एम. एस. सुब्बूलक्ष्मी यांच्यानंतर भारातरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविलेल्या लतादीदी या दुसऱ्या गायिका आहेत. वरील छायाचित्रात लतादीदी, त्यांच्या आई सुधामती मंगेशकर, आणि भावंडे आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ मंगेशकर.
-
१९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अली खाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी उस्ताद अमानत खाँ(देवासवाले) यांच्याकडून शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही दीदींना तालीम मिळाली आहे.
-
ग़ुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा 'शहीद' (१९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेल्या निर्माते शशाधर मुखर्जींशी केली. पण, मुखर्जींनी लताचा आवाज "अतिशय बारीक" म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते – 'येणार्या काळात निर्माते आणी दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणी आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील'. हैदरांनी लतादीदींना 'मजबूर' (१९४८) ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली.
-
लता दीदींनी अखंड परिश्रमाने स्वतःच्या कुटुंबाचे नंदनवन केले. आज त्यांच्या याच कष्टाचे फळ म्हणजे संगीत क्षेत्रात सर्वात पहिला मान मिळातो तो मंगेशकर भावंडांना. संगीत कलेतील महान कुटुंब म्हणून त्यांची जी ख्याती आहे त्या मागे ५० वर्षांहून अधिक काळाचा प्रदिर्घ कष्टमय इतिहास आहे. आणि त्याच इतिहासाचे चालते बोलते प्रतिक आहेत, 'गानकोकिळा' लता मंगेशकर.
-
दीदींनी गायलेल्या काही अजरामर गाण्यांपैकी `ए मेरे वतन के लोगो` या गाण्याने आणि दीदींच्या स्वरांनी अनेकांच्या डोळ्यांतून आसवे घरंगळली. गीतकार प्रदीप यांचे काळाजाला भिडणारे शब्द आणि सी रामचंद्र यांची अप्रतिम संगीतरचा या साऱ्यांचा सुरेख मिलाप असलेले हे गाणं ऐकताच पंडीत जवाहरलाल नेहरुही अक्षरश: गहिवरले आणि त्यांचे डोळे पाणावले.
लतादीदी, मच्छिंद्र कांबळी आणि दशावतार नाटकातील कलाकार मंडळी. -
अनेकदा शब्द आणि संगीतापेक्षाही, केवळ दीदींच्या आवाजामुळे गाण्याचा आशय थेट व्यक्त होतो. त्यांनी सी रामचंद्र, एस डी बर्मन, शंकर जयकीशन यांसारख्या त्याकाळच्या आघाडीच्या संगीतकारांसाठी अनेक गीते गायली आहेत. 'जाल' चित्रपटातील "ये रात ये चांदनी फिर कहां" किंवा 'अनारकली' चित्रपटातील "जिंदगी प्यार की दो चार घडी" , 'बात एक रात की' मधील "ना तुम हमे जानो" अशी किती तरी गीते, त्याला दिलेल्या संगीतापेक्षाही त्यांवर चढवलेल्या आर्जवी स्वरसाजामुळेच कदाचित जास्त लक्षात राहतात.
-
संगीत दिग्दर्शक उस्ताद अली अकबर यांच्यासोबत निलांबरी या चित्रपटाच्या सेटवर गाण्याची तालीम करण्यात व्यग्र असलेल्या लतादीदी.
-
दीदींनी मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांसारख्या त्या काळातील जवळपास सर्वच प्रसिद्ध गायकांबरोबर युगलगीते गायली आहेत. या छायाचित्रात संगीत दिग्दर्शक जयकिशन, मोहम्मद रफी आणि दीदी 'पलको की छाओ मै' या चित्रपटातील गाण्याचे रेकॉर्डिंग करताना.
-
लतादीदींना अमिताभ बच्चन यांच्या हस्ते हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. दीदी या केवळ गायिकाच राहील्या नाही तर त्यांनी ‘आनंदघन’ या नावाने संगीत दिग्दर्शन करत रसिकांना अनेक संगीताविष्काराची दालनेही उघडून दिली.
-
भारताचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' प्राप्त होणाऱ्या गायक-गायिकांमध्ये लता दीदींचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-
हिंदी चित्रपट सृष्टीतील दिलखुलास अभिनेते शम्मी कपूर आणि लतादीदींचे नाते बहिण-भावाचे. लतादीदींनी शम्मी कपूर यांच्या निधनानंतर तीव्र दु;ख व्यक्त केले होते.
-
लतादीदी, जया बच्चन, बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि यश चोप्रा.
-
१९६० च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. ह्या काळात दीदींनी जवळजवळ सर्वच संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यांपैकी अनेक गाणी अजरामर झाली. १९६० मध्ये संगीतकार नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले 'मुघल-ए-आझम' (१९६०) या चित्रपटातील 'प्यार किया तो डरना क्या' हे मधुबालावर चित्रित झालेल्या गाण्याने तर अनेकांनाच भुरळ घातली. 'दिल अपना और प्रीत पराई' या चित्रपचटातील शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले 'अजीब दास्ताँ है ये' हे आजही अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग आहे.
-
'सरहदे' या अल्बमसाठी सोनू निगमचा मुलगा निवान निगम आणि लता दीदींची नात सांजली खाडीकर यांनी गाणे गायले. त्यावेळी या दोघांना जवळ घेऊन त्यांचे प्रशंसा करताना दीदी आणि अभिनेत्री रेखा.
-
लतादीदी आणि आशा भोसले.
निर्मळ सुरांचा अविष्कार…लता मंगेशकर
लतादीदींना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
Web Title: Lata mangeshkar 87 happy birthday lata didi