अभिनेत्री निम्रत कौरचे वडील भारतीय सैन्य दलात होते. १९९४ मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. निम्रत कौरला एक लहान बहीण आहे. रुबिन असं तिचं नाव असून ती मानसोपचारतज्ज्ञ आहे. निम्रतचं शिक्षण दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये झालं. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच तिने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. अभिनेत्री होण्यासाठी तिने सुरुवातीला मॉडेल म्हणूनही काम केलं. 'तेरा मेरा प्यार' या म्युझिक अल्बममुळे ती प्रकाशझोतात आली. २००४ मध्ये कुमार साजू आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात रेकॉर्ड झालेलं हे गाणं चांगलंच गाजलं होतं. ती बऱ्याच जाहिरातींमध्येही झळकली. मात्र कॅडबरी डेरी मिल्क सिल्कच्या जाहिरातीमुळे तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. रितेश बत्रा यांच्या 'द लंचबॉक्स' या चित्रपटातील निम्रतच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. या चित्रपटात तिने इरफान खान व नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत काम केलं होतं. निम्रतने दोन वेळा कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली आहे. 'पेडलर' आणि 'द लंचबॉक्स' या दोन चित्रपटांमुळे तिला कान्सला जाण्याची संधी मिळाली. 'द लंचबॉक्स' या चित्रपटाच्या यशानंतर निम्रतने जवळपास २७ ते ३० भूमिका नाकारल्या होत्या. यानंतर तिने 'एअरलिफ्ट'मध्ये अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली. -
सर्व छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ निम्रत कौर
‘तेरा मेरा प्यार’ अल्बम ते ‘एअरलिफ्ट’, निम्रत कौरविषयी काही खास गोष्टी
Web Title: Unknown facts about the lunchbox and airlift fame actress nimrat kaur ssv