सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झालेली 'स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी' ही वेब सीरिज फारच चर्चेत आहे. १९९२ मध्ये हर्षद मेहता याने बँकांच्या पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून आणि भांडवल बाजारातील दलालांना हाताशी धरून देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणारा ७०० कोटी रुपयांचा शेअर बाजार घोटाळा केला होता. त्यावरच या सीरिजचं कथानक आधारित आहे. 'ओमर्ता', 'शाहिद' आणि 'अलिगढ' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलंय. दहा एपिसोड्सची ही सीरिज सुचेता दलाल आणि देबाशिश बासू यांच्या 'द स्कॅम : हू वन, हू लॉस्ट, हू गॉट अवे' या पुस्तकावर आधारित आहे. यामध्ये सतीश कौशिक, प्रतीक गांधी, श्रेया धनवंतरी, निखिल द्विवेदी आणि अनंत नारायण महादेवन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या वेब सीरिजमधल्या प्रत्येक कलाकाराने दमदार भूमिका साकारल्या असून त्याला 9.6 IMDb रेटिंग मिळाले आहे. हर्षद मेहताची भूमिका साकारणाऱ्या प्रतीक गांधीचं सध्या सोशल मीडियावर फार कौतुक होत आहे. प्रतीक गांधी हा मूळचा सूरतचा आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, २००४ मध्ये त्याने गुजराती नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. २०१४ मध्ये 'बे यार' या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. हिंदी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याने 'युअर्स इमोशनली' या इंग्रजी चित्रपटातही भूमिका साकारली होती. 'मोहन नो मसालो', 'हू चंद्रकांत बक्षी' यांसारख्या नाटकांमध्ये प्रतीकने साकारलेल्या भूमिकांचं विशेष कौतुक झालं. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी प्रतीकने इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं आणि काही काळासाठी त्याने सेल्सपर्सन म्हणूनही काम केलं होतं. चित्रपट समीक्षक आणि पत्रकार सुभाष के. झा यांना दिलेल्या मुलाखतीत प्रतीकने सांगितलं, "२००४ ते २०१६ या कालावधीत मी इंजिनीअरिंग, नाटक आणि लाइव्ह शो या तिन्ही गोष्टी करत होतो. सुरुवातीच्या काही चित्रपटांमध्ये मी इंजिनीअरिंगच्या नोकरीतून सुट्टी घेऊन काम केलं. त्यानंतर मी माझ्या कुटुंबीयांना सांगितलं की मला अभिनयात करिअर करायचंय. ऑगस्ट २०१६ मध्ये मी इंजिनीअरिंगची नोकरी सोडली आणि पूर्णपणे अभिनयावर लक्ष केंद्रीत करू लागलो." प्रतीकने 'राँग साइड राजू', 'व्हेंटिलेटर', 'मित्रों', 'लवयात्री' या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. भविष्यात राजकुमार हिरानी, संजय लीला भन्साळी आणि अनुराग बासू यांसारख्या नामवंत दिग्दर्शकांसोबत काम करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. -
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, प्रतीक गांधी
Scam 1992 : हर्षद मेहताचं काम करणारा प्रतीक गांधी आहे तरी कोण?
इंजिनीअर ते अभिनेता.. असा सुरू झाला प्रतीकचा प्रवास
Web Title: Who is pratik gandhi the actor who played harshad mehta in scam 19 ssv