-
सोनी लिव्ह वर काही दिवसांपूर्वी आलेल्या Scam 1992 द हर्षद मेहता स्टोरी या वेब सिरीजने सर्वांची मनं जिंकली. या वेब सिरीजमध्ये गाजलेल्या भूमिकांची आपण ओळख करु न घेणार आहोत.
-
१) हर्षद मेहताची भूमिका साकारणारा कलाकार आहे प्रतिक गांधी. हर्षदच्या भूमिकेसाठी प्रतिकचं सध्या खूप कौतुक होताना दिसत आहे. हर्षद मेहताची स्टाईल, त्याची बोलण्याची लकब व इतर गोष्टींवर केलेलं काम पाहता प्रतिकच्या अभिनयाचं सध्या प्रचंड कौतुक होताना दिसतंय.
-
२) सुचेता दलाल यांची भूमिका साकारली आहे श्रेया धन्वंतरीने…टाइम्स ऑफ इंडियात काम करणाऱ्या पत्रकार सुचेता दलाल यांनी हर्षद मेहताने केलेला घोटाळा उघडकीस आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. यानंतरही सुचेता दलाल यांनी अनेक आर्थिक घोटाळ्यांचं वृत्तांकन केलं होतं. एका पत्रकारात असणारा निर्भीडपणा श्रेयाने ऑनस्क्रिन हुबेहुब साकारला आहे. सुचेता दलाल यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं.
-
३) हर्षद मेहतासोबत सावलीसारखा वावरणारा त्याचा भाऊ आश्विन मेहताची भूमिका साकारली आहे हेमंत खेरने. आश्विन मेहताही हर्षद मेहताच्या फर्ममध्ये स्टॉकब्रोकर होता. हर्षद मेहताला अटक झाल्यानंतर त्याला बाहेर आणण्यासाठी आश्विनने लॉ ची डिग्री घेतली. आपल्या भावाच्या निधनानंतर आश्विनने न्यायिक लढाई लढत २०१८ साली सर्व प्रकरणातून मुक्तता करुन घेतली.
-
४) हर्षद मेहताची पत्नी ज्योतीची भूमिका साकारली आहे अंजली बारोटने. २०१४ साली ज्योती मेहता यांनी मुंबईतील एका ब्रोकरविरोधात हर्षद मेहताचे ६ कोटी लाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ५ वर्ष हे प्रकरण न्यायालयात चाललं, ज्यानंतर २०१९ साली याचा निकाल ज्योती मेहता यांच्या बाजूने लागला.
-
५) सुचेता दलाल यांचे पती देबाशिष बसू यांची भूमिका साकारली आहे फैजल रशिद या अभिनेत्याने. हर्षद मेहताने केलेला घोटाळा उघडकीस आणण्यात देबाशिष यांचीही महत्वाची भूमिका होती. सुचेता दलाल यांनी लिहीलेलं द स्कॅम हे पुस्तक लिहीण्यातही देबाशिष यांचा मोलाचा वाटा आहे.
-
६) जय उपाध्याय या कलाकाराने साकारलेली प्रणव सेठ ही भूमिका स्टॉकब्रोकर केतन पारेखच्या जिवनावर आधारीत आहे. पेशाचे CA असणारा केतन पारेख हर्षद मेहताच्या ग्रोमोअर इनव्हेस्टमेंट या फर्ममध्ये कामाला होता. परंतू १९९२ च्या आर्थिक घोटाळ्यात त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र २००१ साली गाजलेल्या Stock Manipulation प्रकरणात केतन पारेखवर कारवाई करुन त्याला इंडियन स्टॉक मार्केटमध्ये २०१७ पर्यंत बॅन करण्यात आलं होतं.
-
७) दिवंगत वकील राम जेठमलानी यांची भूमिका साकारली आहे मिथीलेश चतुर्वेदी या अभिनेत्याने. राम जेठमलानी यांनी कोर्टात हर्षद मेहताची बाजू मांडली होती.
-
८) अभिनेते सतिश कौशिक यांनी साकारलेली मनु मुंद्रा ही भूमिका ८० च्या दशकात स्टॉक मार्केटचे बादशहा म्हणून ओळख असलेल्या मनु मानेक यांच्यावर आधारित आहे. त्या काळात मानेक यांना ब्लॅक कोब्रा नावाने ओळखलं जायचं. स्टॉक मार्केट स्कॅममध्ये मानेक यांचं नाव कधीही आलं नव्हतं.
Reel vs Real : जाणून घ्या ‘Scam 1992 द हर्षद मेहता स्टोरी’ वेबसिरीज गाजवणाऱ्या पात्रांविषयी
कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे वेबसिरीजला प्रेक्षकांची पसंती
Web Title: Real life faces of the characters from the web series scam 1992 the harshad mehta story psd