-
बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधत नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. (Photos: Shivsena Twitter/ Urmila Matondkar Instagram)
-
राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्याआधी उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
-
उर्मिला मातोंडकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर पोहोचल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन बांधत पक्षात स्वागत केलं. यानिमित्ताने उर्मिला मातोंडकर यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आपण आढावा घेणार आहोत.
-
९० च्या दशकातील प्रसिद्द अभिनेत्रींचं नावं घेतली तर त्यातील एक आघाडीचं नाव म्हणजे उर्मिला मातोंडकर. प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालेल्यांमध्ये उर्मिला मातोंडकर यांचा समावेश होता आणि अजूनही आहे.
-
आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने त्यांनी अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं.
-
४ फेब्रुवारी १९७४ मध्ये जन्म झालेल्या उर्मिला मातोंडकर यांनी बालकलाकार म्हणून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली.
-
पुणे विद्यापीठातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.
-
१९८० मध्ये श्रीराम लागू यांनी उर्मिला मातोंडकर यांना आपल्या 'झाकोळ' चित्रपटात संधी दिली. त्यावेळी त्याचं वय सहा वर्ष होते.
-
'मासूम' चित्रपटातील त्यांची भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. चित्रपटातील त्यांचं 'लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा' गाणही आजही प्रसिद्ध आहे.
-
१९८९ मध्ये उर्मिला यांनी मल्याळम चित्रपट 'चाणक्यन' मध्ये काम केलं होतं. यामध्ये कमल हासन प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
-
१९९१ मध्ये आलेल्या 'नरसिम्हा' चित्रपटातून त्यांनी अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी उर्मिला यांनी काही टीव्ही मालिकांमध्येही काम केलं होतं.
-
रंगीला चित्रपटामुळे उर्मिलाला खूप प्रसिद्धी मिळाली. यामुळे ती रंगीला गर्ल म्हणूनही ओळखू जावू लागली.
-
याशिवाय १९९७ मध्ये आलेला जुदाई, १९९८ मधील सत्या, जंगल, कौन, प्यार तूने क्या किया, मैने गांधी को नही मारा अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाला दाद मिळाली.
-
रंगीला, जुदाई आणि सत्या या तीन चित्रपटांना फिल्मफेअर नॉमिनेशनही मिळालं होतं.
-
'छम्मा छम्मा' सारख्या अनेक गाण्यांमुले उर्मिलाला डान्सिंग क्वीन म्हणूनही ओळखलं जात होतं.
-
२०१४ मध्ये आलेल्या 'आजोबा' या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं.
-
पण बॉलिवूडमध्ये उर्मिला मातोंडकर यांना मराठी असल्याने खूप संघर्ष करावा लागला होता. त्यांना घाटी असं संबोधलं जायचं. त्यांनीच एका मुलाखती बोलताना याचा खुलासा केला होता.
-
“एक अभिनेत्री असल्याचा, मराठी असल्याचा मी त्रास सहन केला आहे, मी अनेक गोष्टी भोगल्या आहेत. मी त्यावेळी नेपोटिझमबद्दल बोलले नाही. मात्र आत्ता मी या सगळ्या गोष्टी बोलते आहे. त्यावेळी मराठी लोकांना चित्रपटसृष्टीत घाटी असंही संबोधलं जात होतं,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.
-
रंगीला हा सिनेमा मी केला तेव्हा अनेकांना वाटलं की मी त्यात अभिनय केलाच नाही मी फक्त छोटे कपडे घालून नाचले. अनेक लोकांनी त्यावेळी असाच समज करुन घेतला होता. एका प्रख्यात मराठी दिग्दर्शकानेही मी त्यांचा चित्रपट नाकारल्याने माझ्यावर टीका केली. त्या काळात सोशल मीडिया नव्हता. नेपोटिझम हा खूप काळापासून आहे असंही परखड मत त्यांनी मांडलं होतं.
-
२०१६ मध्ये उर्मिला यांनी काश्मिरी मॉडेल, उद्योजक मोहसीन अख्तरसोबत यांच्यासोबत लग्न करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यासाठी त्यांनी धर्मांतरही केलं.
-
उर्मिला आणि त्यांच्या पतीमध्ये १० वर्षाचं अंतर आहे.
-
२०१८ मध्ये आलेल्या 'ब्लॅकमेल' चित्रपटानंतर उर्मिला मातोंडकर बॉलिवूडपासून दूरच आहेत. या चित्रपटात त्यांनी आयटम नंबर केला होता.
-
२०१९ मध्ये उर्मिला मातोंडकर यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
-
त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षातील गोंधळावर बोट ठेवत पक्षाचा राजीनामा दिला होता.
-
काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या.
-
राजकारणात येण्यासंबंधी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, “एक कलाकार म्हणून जगातील ऐशोआरामाची अशी कोणतीच गोष्ट नाहीये जी माझ्या आयुष्यात नव्हती. पण सामाजिक बांधिलकी, सामाजिक कृतज्ञता समजणाऱ्या एका कुटुंबात आणि प्रदेशात माझा जन्म झाला होता. त्यामुळे मी काहीतरी लोकांना थोडं परत द्यावं या विचाराने राजकारणात आले होते”.
-
काँग्रेस का सोडली यावर त्यांनी “पण त्या काळात मी जे करु इच्छित आहे ते करायला मिळत नाहीये असं वाटलं. घिसडघाई होत असल्याची जाणीव होत होती. माझी पत्रं लिक केली गेली. त्या पत्रांमध्ये मी केवळ मुंबई स्तरावर पक्षात काही बदल व्हावेत यासाठी प्रयत्न करत होते. पण त्यातलं काहीही होत नव्हतं. आपण करत असलेले प्रयत्न मर्यादित होत असून, काहीच होत नाहीये तर नावापुरतं तिथं राहण्यापेक्षा तीच गोष्ट एखाद्या पक्षात न राहता स्वतंत्रपणे करु इच्छिते आणि करत आहे,” असं उत्तर दिलं होतं.
-
पण आता शिवसेनेसोबत नव्याने राजकीय वाटचाल सुरु केली आहे.
-
विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त जागेसाठी शिवसेनेच्या कोटय़ातून उर्मिला मातोंडकर यांचे नाव महाविकास आघाडी सरकारने पाठवलं आहे. त्यांची निवड जवळपास निश्चित आहे.
बॉलिवूडमध्ये घाटी संबोधलं जाण्यापासून ते शिवसैनिक; असा आहे उर्मिला मातोंडकरांचा संघर्ष
उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे
Web Title: Bollywood actress urmila matondkar journey from child actor to shivsena sgy