-
जगभरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे. याच पार्श्वभूमीवर करोनावरील लस बनवण्यासाठी अनेक संशोधक आणि वैज्ञानिक युद्धपातळीवर काम करत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये करोनावरील लस बनवण्याचं काम सुरु असून वेगवेगळ्या देशांमधील लसींच्या चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहेत. असं असतानाच आता अमेरिकेतील संशोधकांनी करोनावर सर्वात प्रभावी ठरणारी लस बनवल्याचा दावा केला आहे. या लसीची प्राण्यांवर यशस्वीपणे चाचणी करण्यात आल्याचा दावाही वैज्ञानिकांनी केला आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक)
-
यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधील औषधांसंदर्भात संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी ही शोधल्याचा दावा केला आहे. ही नवीन लस करोनाविरुद्ध लढण्यासाठी शरीरामध्ये इतर कोणत्याही लसीपेक्षा खूप जास्तप्रमाणामध्ये अॅण्टीबॉडीज तयार करते असं संशोधकांचे म्हणणं आहे.
-
या लसीची निर्मिती नॅनो पार्टीकल्सचा म्हणजेच अति सूक्ष्म कणांचा वापर करुन करण्यात आलीय. हा लसीची प्राण्यांवर चाचणी करण्यात आली असून ती यशस्वी ठरल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.
-
करोनामधून पूर्णपणे बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या तुलनेत अधिक प्रमाणामध्ये न्यूट्रलाइजिंग अॅण्टीबॉडीज ही लस निर्माण करते. संशोधकांनी प्राण्यांवर केलेल्या प्रयोगादरम्यान उंदरांना ही लस देण्यात आली. त्यानंतर मानवी शरीर आणि उंदारच्या शरीरामधील अॅण्टीबॉडीजचा तुलनात्मक अभ्यास करुन संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे.
-
या लसीसंदर्भातील संशोधन सेल नावाच्या जर्नलमध्ये छापण्यात आलं आहे. यानुसार उंदारांना देण्यात येणाऱ्या लसीचे प्रमाणे सहा टक्क्यांनी कमी केल्यानंतरही त्यांच्या शरीरामध्ये न्यूट्रलाइजिंग अॅण्टीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण १० टक्क्यांनी अधिक होतं.
-
याचबरोबर या लसीला शक्तिशाली बी सेल इम्यून रिस्पॉन्स मिळत असल्याचे दिसून आलं. ही लस दिर्घकाळापर्यंत प्रभावी ठरेल असा विश्वास वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.
-
माकडांवरही या लसीची चाचणी करण्यात आल्याचे संशोधकांनी म्हटलं आहे. या संशोधनामध्ये माकडाला ही लस देण्यात आली तेव्हा त्याच्या शरीरामध्ये निर्माण झालेल्या अॅण्टीबॉडीजने करोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनवर हल्ला केल्याचे दिसून आलं.
-
करोना विषाणूमधील स्पाइक प्रोटोनच्या मदतीनेच तो मानवी पेशीमध्ये शिरकाव करतो. त्यामुळे करोना विषाणूच्या रचनेमध्ये बदल झाला तरी ही लस प्रभावी ठरले असा विश्वास वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.
-
संशोधनामध्ये या करोना लशीची रचना (मॉलिक्युलर स्ट्रक्चर) ही करोना विषाणूशी साधर्म्य साधणारी असल्याचेही दिसून आलं आहे, असंही संशोधकांनी म्हटलं आहे.
-
लसची रचना विषाणूसारखीच असल्यामुळे लस दिल्यास शरीरामधील इम्युन रिस्पॉन्स ट्रिगर करण्यासाठी अधिक फायदा होईल असंही सांगितलं जात आहे.
-
ही लस बनवण्यासाठी वैज्ञानिकांनी विषाणूमधील स्पाइक प्रोटीनच्या रचनेचा पूर्ण उपयोग केलेला नाही. ही लस म्हणजे स्पाइक प्रोटीनच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनची ६० टक्के नक्क आहे असं सांगण्यात आलं आहे.
करोनावर मात करणार ‘सुपर व्हॅक्सिन’; संशोधक म्हणाले, “ही लस अनेक पटींनी अधिक प्रभावी”
जाणून घ्या नक्की कशाप्रकारे ही लस अधिक प्रभावी ठरणार असल्याचे सांगण्यात आलंय
Web Title: Scientists have developed ultrapotent covid 19 vaccine candidate study scsg