-
मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, रुग्णसंख्या थोडी वाढली तरी पुरेशा खाटा आणि अन्य सुविधा उपलब्ध आहेत.
-
त्यामुळे मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करावेत, अशी भूमिका पालिकेने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाबरोबरच्या बैठकीत मांडली.
-
'डेल्टा प्लस'च्या भीतीमुळे राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या स्तरात ठेवून २८ जूनपासून जुनेच निर्बंध लागू ठेवले आहेत.
-
त्यामुळे व्यवहार थंडावले असून, अर्थचक्र मंदावले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही निर्बंध शिथिल करण्यास हरकत नाही, असे मत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी राज्याच्या आरोग्य विभागासोबत झालेल्या बैठकीत मांडल्याचे समजते.
-
करोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य विभागाने ही बैठक आयोजित केली होती. करोनामुळे लागू असलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
-
निर्बंधाबाबत करोना कृतिदलाशी चर्चा करून काही दिवसांत राज्य सरकार निर्णय घेईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
-
मुंबईत आता जम्बो रुग्णालयांची संख्या वाढली असून, पुरेशा खाटाही उपलब्ध आहेत. तसेच रुग्णांसाठी अन्य सुविधाही उपलब्ध असल्यामुळे थोडे निर्बंध खुले केल्यास रुग्णसंख्या वाढली तरी सुविधा उपलब्ध होऊ शकतील.
-
आरोग्य व्यवस्था पुरेशी सक्षम असल्याने रुग्णसेवा पुरविणे शक्य होणार आहे.
-
त्यामुळे मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात खुले केल्यास फारसा परिणाम होणार नाही, असे मत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केले.
-
राज्यात करोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून, मंगळवारी सात हजार २४३ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात १९६ रुग्णांचा मृत्यू झाला. कोल्हापूरमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागली असली तरी सांगलीत मात्र चिंता कायम आहे.
-
मुंबईत मंगळवारी ४४१, रायगड जिल्हा ३५१, रत्नागिरी २८३, सिंधुदुर्ग १५७, पुणे ग्रामीण ५२८, सोलापूर ४१२, सातारा ७७७, कोल्हापूर ग्रामीण ७०४, कोल्हापूर मनपा २८६, सांगली ९०० नवे रुग्ण आढळले.
-
मुंबईत ४ ते १० जुलै या आठवड्यात प्रतिदिन सरासरी सुमारे ३४, ५०० करोना चाचण्या करण्यात आल्या.
-
या आठवड्यात प्रतिदिन सरासरी ५०० रुग्णांची नव्याने भर पडली. बाधितांचे प्रमाण दीड टक्क्यांच्या आसपास असल्याचे आढळले.
-
सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासाला इतक्यात मुभा देऊ नये, असा सूर या बैठकीत उमटला.
-
सर्वाना रेल्वे प्रवासास परवानगी दिल्यास रुग्णसंख्या झपाट्याने वाढण्याची भीती असून, मुंबई उपनगरांसह मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांची मुंबईतील वर्दळ वाढण्याची शक्यता आहे, असे मत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
मुंबईत लॉकडाउन वाढणार?
Web Title: Corona pandemic mumbai lockdown covid 19 restrictions local trains travel unlock guidelines bmc relaxations covid norms sdn