-
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील राजकीय वातावरण थंडीतही गरम झाले आहे. विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर ११ फेब्रवारीला सत्ता कुणाची हा प्रश्न निकाली लागणार आहे. आप, भाजपा आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत दिल्लीत बघायला मिळणार आहे. भाजपा केंद्रात सत्तेत आहे. दिल्लीची सूत्रे आपकडे आहेत. तर काँग्रेस विरोधी बाकांवर आहे. त्यामुळे दिल्लीच्या मैदानात कोण वरचढ ठरणार यावर टाकलेली नजर…
-
आम्हाला लोकांनी कामाच्या आधारावर मतं द्यावी, असं मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले आहेत. आता विकासाच्या मुद्याला जर मतदारांनी प्राधान्य दिलं, तर आम आदमी पक्षाचं पारडं जड ठरणार आहे.
-
आप सरकारने सरकारी शाळांमधल्या सुविधांमध्ये केलेल्या आमूलाग्र सुधारणा, महिलांना बसमध्ये मोफत प्रवास, वस्त्या वस्त्यांमध्ये गरीबांसाठी मोहल्ला क्लिनिक व सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या पाणी व वीज या मुलभूत सुविधांसंदर्भात घेतलेले निर्णय आपसाठी फायदेशीर ठरू शकतात.
-
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीएसडीएसनं एक पाहणी केली. यात ५३ टक्के मतदार आप सरकारच्या कामावर समाधानी आहे. तर ३३ टक्के मतदार काही प्रमाणात समाधानी आहेत.
-
दहापैकी नऊ मतदारांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या कामावर समाधान व्यक्त केलं आहे. शंभरपैकी ६६ टक्के मतदारांनी ठामपणे आप सरकार पाठिंबा दर्शवला आहे. ४९ टक्के मतदारांचा मोदींना पाठिंबा आहे.
-
गेल्या काही वर्षांपासून राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आधीच जाहीर करते. अगदी २०१४च्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीत किरण बेदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. पण, यावेळी सात खासदार असलेल्या भाजपाकडे चेहराच नाही.
-
केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिल्लीत भाजपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी लागत आहे. विशेष म्हणजे आपच्या विकासकामांना उत्तर देण्यासाठी भाजपाकडे अद्याप तरी काही अजेंडा नाही. त्यामुळे भाजपानं नेहमीचं अस्त्र असलेल्या राष्ट्रवादाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर करताना दिसत आहे.
-
दिल्लीची निवडणूक मोदींच्या नेतृत्वाखाली लढणार असली, तरी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासाठीही ही निवडणूक महत्त्वाची आहे. झारखंड आणि महाराष्ट्रात शाह यांच्या राजकीय कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. त्यामुळे शाह यांनीही दिल्लीतील निवडणुकीत लक्ष घातले आहे.
-
लोकसभा निवडणुकीनंतरही महाराष्ट्र, झारखंड ही दोन राज्ये भाजपाच्या हातून गेली. हरयाणातील सत्ता राखण्यात भाजपाला यश आलं. पण, त्यासाठी बऱ्याच तडजोडी पक्षनेतृत्वाला कराव्या लागल्या. त्यामुळे भाजपाला ही निवडणूक जिंकण महत्वाचं असणार आहे.
-
काँग्रेस आणि 'आप' सुधारित नागरिकत्व कायद्यावरून लोकांमध्ये अफवा पसरवत आहे. त्यामुळे भाजपा ४७ जागा जिंकेल असा दावा दिल्लीचे भाजपाध्यक्ष मनोज तिवारी यांनी केला आहे. पण, भाजपा राष्ट्रवादाच्या मुद्यावरच निवडणूक लढवणार हेसुद्धा त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले.
-
२०१३मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दिल्लीतील सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. तब्बल १५ वर्ष दिल्लीची सत्ता काँग्रेसकडे होती. मात्र, गेल्या वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
-
२०१५मध्ये ९.५ टक्के मते काँग्रेसला मिळाली होती. अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी २२.६३ टक्क्यांवर गेली. पण, दिल्लीतील अलिकडचा राजकीय इतिहास पाहता लोकसभेतील वाढलेली आकडेवारी विधानसभेत कायम राहिलं का? हा प्रश्नच आहे.
दिल्ली कुणाची; आप, भाजपा की काँग्रेस मारणार बाजी?
दिल्लीची विधानसभेची निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची
Web Title: Delhi assembly election who will win in battle of delhi election bmh