-
गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाचं प्रो-कबड्डीतलं हे पहिलंच पर्व. मात्र भल्या भल्या संघांना चकीत करत गुजरातच्या तरुण संघाने प्ले-ऑफच्या शर्यतीत स्थान पटकावलं आहे. तरुणांवर दाखवलेला विश्वास. त्यांना अनुभवी खेळाडूंची साथ आणि सर्वोत्तम मार्गदर्शन ही त्रिसुत्री यंदा गुजरातच्या चांगल्या कामगिरीमागचं गमक ठरली आहे. चढाईत सचिन तवंर, रोहित गुलिया, महेंद्र राजपूत, कर्णधार सुकेश हेगडे; तर बचावफळीत फैजल अत्राचली, अबुझार मेघानी आणि परवेश भैंसवाल यांनी साखळी फेरीत गुजरातला 'अच्छे दिन' आणले. त्यामुळे पुढच्या फेऱ्यांमध्ये हा संघ कशी कामगिरी करतो हे पहावं लागणार आहे.
-
गुजरात प्रमाणे हरियाणा स्टिलर्सचंही यंदाचं पहिलंच पर्व. मात्र सुरिंदर नाडाचा भक्कम बचाव आणि अनुभवी वझीर आणि सुरजीत सिंहची आक्रमक खेळी यंदा हरियाणासाठी चांगलीच फायदेशीर ठरली. विकास कंडोलासारखा तरुण खेळाडू हा हरियाणाच्या संघासाठी खऱ्या अर्थाने बोनस ठरला आहे. प्रथितयश संघांना मात देत हरियाणाने यंदाच्या स्पर्धेच्या प्ले-ऑफ गटात प्रवेश केला आहे.
-
पुणेरी पलटण हा यंदाच्या पर्वातला प्ले-ऑफमध्ये प्रवेश केलेला एकमेव महाराष्ट्राचा संघ. यंदाच्या पर्वात पुण्याचा संघ प्ले-ऑफमध्ये सहजरित्या पोहचला नसला तरीही दीपक हुडाने आपल्या संघाची चांगली बांधणी केली. मनजीतच्या अनुपस्थितीत दीपक हुडाने पुण्याचा यंदा प्ले-ऑफची फेरी गाठून दिली आहे. पुणे या स्पर्धेतला सर्वात जुना आणि अनुभवी संघ मानला जातो. त्यामुळे प्ले-ऑफच्या गटात पुण्याची गाठ कोणाशी पडते हे पहावं लागणार आहे.
-
बंगाल वॉरियर्स या संघाने यंदा आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकीत केलं आहे. पहिल्या ४ पर्वांनंतर संघ व्यवस्थापनाने नव्याने संघाची उभारणी केली. सुरजित सिंह सारख्या बचावपटूकडे संघाचं नेतृत्व केलं, ज्याचा मैदानात त्यांना चांगलाच फायदा झाला. दुखापतीतून सावरलेला मणिंदर सिंह बंगालसाठी चांगलाच फायदेशीर ठरला. कोरियन सुपरस्टार जँग कून लीचा आक्रमक खेळही बंगालच्या संघासाठी चांगलाच फायदेशीर ठरलाय.
-
गतविजेत्या पाटणा पायरेट्स संघानेही यंदा प्ले-ऑफच्या गटात प्रवेश मिळवला आहे. मात्र या कामगिरीचं श्रेय जातं ते कर्णधार प्रदीप नरवाल आणि मोनू गोयत या जोडीला. प्रदीप आणि मोनूने बहुतांश सामन्यांमध्ये पाटण्याच्या चढाईची धुरा सांभाळत संघाला विजय मिळवून दिला आहे. या संघात विशाल माने, सचिन शिंगाडेसारखे नावाजलेले बचावपटू आहेत, मात्र त्यांना त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाहीये. त्यामुळे प्ले-ऑफच्या गटात पाटण्याच्या बचावपटूंनाही चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
-
बंगळुरु बुल्सविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागूनही उत्तर प्रदेशचा संघ यंदाच्या पर्वात प्ले-ऑफच्या गटात पोहचला आहे. प्ले-ऑफमध्ये दाखल होण्यासाठी आवश्यक असलेला अवघा १ गुण उत्तर प्रदेशने आपल्या पराभवाचं अंतर ७ पेक्षा कमी गुणांनी ठेवत वसुल केला. कर्णधार नितीन तोमर, मुंबईकर रिशांक देवाडीगा, जीवा कुमार यासारख्या खेळाडूंनी यंदा पहिल्या सामन्यापासून आपल्या संघाचं अस्तित्व कायम ठेवत प्ले-ऑफच्या गटात स्थान मिळवलं
प्रो-कबड्डीच्या प्ले-ऑफ फेरीचे दावेदार ठरले, पाहा कोणाला मिळाली संधी?
कोण मारणार प्ले-ऑफमध्ये बाजी?
Web Title: Pro kabaddi season 5 these 6 teams makes entry in play off read who are they