जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या आंतिम सामन्यासाठी आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. १८ जून ते २२ जून असा हा सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये खेळवला जाईल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा हा पहिला हंगाम असल्याने विजेता कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेनने या स्पर्धेत १३ सामन्यात १६७५ धावा फटकावल्या आहेत. मात्र या स्पर्धेत सर्वाधिक धावा ठोकणारे पाच भारतीय फलंदाज तुम्हाला माहीत आहेत का? भारताचा आधारस्तंभ फलंदाज अशी चेतेश्वर पुजाराची ओळख आहे. कसोटीत मातब्बल असलेला हा फलंदाज जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वल पाच फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. त्याने १७ सामन्यात ८१८ धावा केल्या आहेत. यात त्याला एकही शतक ठोकता आले नसले तर त्याच्या खात्यात ९ अर्धशतके जमा आहेत. काही कालावधीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारा सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवाल या यादीत चौथ्या स्थानी आहे. त्याने १२ सामन्यात ३ शतके आणि २ अर्धशतकांसह ८५७ धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. विराटला मागील काही काळापासून शतकाची आस आहे. मागील १२ कसोटी डावांमध्ये विराटला एकही शतक करता आलेले नाही. विराटने या स्पर्धेतील १४ सामन्यात ८७७ धावा केल्या आहेत. यात त्याने २ शतके आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत. दुसरा मुंबईकर फलंदाज रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मर्यादित षटकांमध्ये चमकदार कामगिरी करणारा रोहित कसोटी क्रिकेटमध्ये फार चालला नव्हता, पण त्याने आता जम बसवण्यास सुरुवात केली आहे. रोहितने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ११ सामन्यात ४ शतके आणि २ अर्धशतकांसह १०३० धावा केल्या आहेत. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि संघात 'अज्जू' अशा नावाने ओळखला जाणारा अजिंक्य रहाणे या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मागील दोन वर्षात अजिंक्यने कसोटी संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने १७ सामन्यात १०९५ धावा फटकावल्या आहेत. यात त्याने ६ अर्धशतके तर ३ शतके ठोकली आहेत.
WTC : सर्वाधिक धावा ठोकणारे पाच भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानावर आहे सर्वांचा लाडका ‘अज्जू’
Web Title: Team indias top five run getters in world test championship adn