-
अमेरिकेत न्यूयॉर्कमधील एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने तीन मिनिटांमध्ये ९०० जणांना नोकरीवरुन काढून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. बेटर डॉट कॉम नावाच्या कंपनीमधून ही कर्मचारी कपात करण्यात आलीय.
-
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार या कंपनीचे सीईओ विशाल गर्ग यांनी मागील बुधवारी कर्मचाऱ्यांसोबत झूम कॉल केला होता. याच बैठकीत गर्ग यांनी ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं. हा आकडा कंपनीमधील एकूण कर्मचारी संख्येच्या १५ टक्के आहे.
-
गर्ग हे भारतीय वंशाचे असल्याचे या बातमीची भारतामध्येही चांगलीच चर्चा रंगलीय. जगभरामध्ये विशाल यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्याचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय.
-
या बातमीनंतर गर्ग हे नक्की कोण आहेत? त्यांची कंपनी काय काम करते? त्यांची संपत्ती किती? ते व्हिडीओ कॉलमध्ये काय बोलले यासंदर्भातील माहिती भारतीय सर्च करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात या नकोश्या कारणासाठी सध्या जगभरात चर्चेत असणाऱ्या विशाल गर्ग यांच्याबद्दल…
-
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेसहीत जगभरामधील अनेक देशांमध्ये सुट्ट्यांचा कालावधी सुरु होतोय. त्यापूर्वीच गर्ग यांच्या कंपनीने कॉस्ट कटींगचा विचार करुन मोठ्या संख्येने कर्मचारी कपात केलीय. ही कर्मचारी कपात झूम कॉलवरुन करण्यात आलीय.
-
कंपनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करणार आहे याची कोणतीही पूर्वसूचना किंवा कल्पना देण्यात आली नव्हती. बेटर डॉट कॉमची गुंतवणूक जपानमधील सॉफ्ट बँकेमध्ये आहे. गर्ग यांच्या या कंपनीचं एकूण मूल्य हे ७ अब्ज डॉलर इतकं आहे.
-
कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने केवळ तीन मिनिटांमध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात पिंक स्लिप दिली.
-
‘मार्केट बदललं आहे. आपल्याला संघर्ष करत राहयला हवं. त्यामुळेच हा निर्णय स्वीकारुन तुम्ही पुढे वाटचाल करावी,’ असं गर्ग यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं.
-
कर्मचाऱ्यांचे कंपनीमध्ये फारसं योगदान नाहीय असं गर्ग यांनी आधी सांगितलं. त्यानंतर वर्किंग अवर्स म्हणजेच कामाच्या तासांसंदर्भात आपला आक्षेप व्यक्त करताना तुम्ही केवळ दोन तास काम करता, असंही गर्ग म्हणाले.
-
गर्ग यांनी पुढे बोलताना हा कॉल झाल्यानंतर तुम्हाला एचआरकडून कामावरुन काढून टाकल्याचा ईमेल येईल, अशी माहिती दिली.
-
२०२० मध्येही गर्ग यांनी कर्मचाऱ्यांवर आळशी असल्याचा आरोप केल्याचं वृत्त फोर्ब्सने दिलं होतं.
-
विशाल गर्ग हे बेटर डॉट कॉमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. ही एक डिजिटल फर्स्ट होम ओनरशिप कंपनी आहे.
-
लिंक्टइनवरील माहितीनुसार गर्ग हे वन झीरो कॅपिटल या कंपनीचे संस्थापक भागीदारही आहेत. याच वर्षाच्या सुरुवातीला गर्ग यांनी न्यूयॉर्क शहरामधील सार्वजनिक शाळेतील विद्यार्थ्यांना करोना कालावधीमध्ये अडथळ्याविना अभ्यास करता यावा यासाठी दोन मिलियन डॉलर्स दान केले होते.
-
गर्ग यांनी दान केलेल्या पैशांमधून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना आयपॅड आणि इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी करण्यात आलेला.
-
अमेरिकन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गर्ग यांची एकूण संपत्ती ४ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झाल्यास ३० हजार १७२ कोटी रुपये इतकी त्यांची नेटवर्थ आहे. (सर्व फोटो बेटर डॉटकॉम, लिंक्डइन, युट्यूब, ट्विटर, रॉयटर्सवरुन साभार)
तीन मिनिटांच्या Zoom Call मध्ये ९०० जणांना कामावरुन काढणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या सीईओची संपत्ती किती माहितीय का?
अवघ्या तीन मिनिटांमध्ये त्याने आपल्या कंपनीमधील १५ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं आणि ते सुद्धा झूम कॉलवरच…
Web Title: Fires 900 people over zoom call who is better dot com ceo vishal garg facts and information scsg