खडकवासला धरणातून तब्बल ३० हजार ट्रक गाळ उपसल्यामुळे त्याची पाणी साठविण्याची क्षमता वाढली आहे. ‘ग्रीन थम्ब’ या संस्थेतर्फे हाती घेण्यात आलेल्या ‘डि-सिल्टिंग ऑफ खडकवासला डॅम’ या उपक्रमामुळे हे साध्य झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकांनी केलेल्या श्रमदानामुळे हे साध्य झाले, असेही ते म्हणाले.
या उपक्रमाअंतर्गत ग्रीन थम्ब संस्थेने खडकवासला धरणाच्या आजूबाजूच्या दोन किलोमीटरहून अधिक परिसरातील सुमारे ३० हजार ट्रक गाळ काढला आहे. त्यामुळे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता वाढून पाच कोटी लिटरने वाढली आहे. तसेच या संस्थेने खडकवासला परिसरात अंदाजे २५ हजार वृक्षांची लागवड केली आहे. काढलेली माती सुपीक असल्यामुळे त्याचा वापर शेतकरी शेतीसाठी करीत आहेत.
ग्रीन थम्ब या संस्थेची भविष्य काळात धरणाच्या भोवती सात ते आठ किलोमीटरचा सायकल ट्रॅक तयार करणे तसेच दोन वर्षांत धरणाच्या पाणी साठवण्याच्या क्षमतेत १ टीएमसीपर्यंत वाढ करण्याची योजना आहे. या उपक्रमाला अॅमनोरा पार्क टाऊन, राज्याचे जलसंधारण खाते, पुणे महानगरपालिका आणि पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस)विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले आहे, असेही त्यांनी सांगितले.