पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कार्ला फाटय़ाजवळ भरधाव मोटार रस्त्यालगतच्या भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात नवी मुंबई येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये पाच वर्षांची चिमुकली बचावली आहे. हे सर्व जण एकवीरा देवीचे दर्शन घेऊन मुंबईकडे परतत असताना संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास हा अपघात झाला.
जनार्दन वांगा वासकर (वय ६५), लीलाबाई जनार्दन वासकर (वय ६०), रवींद्र जनार्दन वासकर (वय ३५), रूपेश जनार्दन वासकर (वय २८) आणि सुवर्णा वासकर (रा. खारघर, नवी मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासकर कुटुंबीय सकाळी एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. कार्ला फाटय़ाजवळ स्विफ्ट चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका धाब्याच्या भिंतीवर जाऊन धडकली. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी तत्काळ दरवाजा तोडून सर्वाना बाहेर काढले. सुवर्णा यांना जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले, पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये सुवर्णा यांची पाच वर्षांची चिमुकली आचल ही बचावली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 dead in accident near karla