शहरात मोठय़ा प्रमाणात आर्थिक व्यवहार होणाऱ्या शासकीय कार्यालयांवर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (अॅन्टी करप्शन ब्युरो- एसीबी) नजर राहणार आहे. तक्रारदाराची वाट पाहात न बसता एसीबीचे अधिकारी संबंधित कार्यालयात तक्रारदार शोधून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहेत.
पुणे शहरात मोठय़ा संख्येने शासकीय कार्यालये आहेत. या ठिकाणी विविध कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांना अधिकाऱ्यांचे हात ‘ओले’ करावे लागतात. या प्रवृत्तीचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शहरातील महत्त्वाच्या कार्यालयांवर विशेष नजर ठेवली जाणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी ही माहिती दिली. एसीबीचे अधिकारी मोठय़ा शासकीय कार्यालयांवर नजर ठेवण्याबरोबरच या कार्यालयांमध्ये जाऊन तक्रारदारही शोधणार आहेत. तसेच तक्रार देण्यासाठी नागरिकांचे प्रबोधनही केले जाणार आहे.
या नव्या कार्यपद्धतीबाबत डॉ. प्रधान यांनी सांगितले, की मोठे आर्थिक व्यवहार होणाऱ्या शासकीय कार्यालयांची माहिती मिळवून त्या कार्यालयांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्याबरोबरच एखादी योजना जाहीर झाल्यानंतर त्यासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी गुप्त पद्धतीने अथवा रीतसर शासकीय प्रक्रियेद्वारे मिळवून त्या लाभार्थ्यांशीही संपर्क साधला जाणार आहे. एखाद्या नागरिकाकडे त्याचे काम करून देण्यासाठी शासकीय अधिकारी लाचेची मागणी करीत असेल, तर संबंधित नागरिकाने तक्रार द्यावी, यासाठी अशा नागरिकाचे प्रबोधनही केले जाईल. त्याबरोबर एसीबीचे काही अधिकारी शासकीय कार्यालयांच्या बाहेर राहतील. एखाद्या कार्यालयातील नियमाप्रमाणे जमलेल्या शुल्कापेक्षा जास्त रक्कम संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांकडे आढळून आल्यास देखील कारवाई केली जाणार आहे.
लाच देताना संबंधित शासकीय अधिकाऱ्याला दिलेली रक्कम तक्रारदाराला एका महिन्याच्या आत धनादेशाद्वारे दिली जाते. तसेच अधिकाऱ्यावर कारवाई केल्यानंतर ज्या कामाच्या बाबतीत तक्रार दिली गेली असेल, ते तक्रारदाराचे कामही पूर्ण करून दिले जाते. त्याबरोबरच तक्रारदाराला त्रास होऊ नये म्हणून संरक्षणही दिले जाते. तक्रारदाराचे नावही गुप्त ठेवले जाते. त्यामुळे कोणी शासकीय अधिकारी शासकीय काम करून देण्यासाठी लाच मागत असेल, तर नागरिकांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याबाबत एसीबीकडे तक्रार आली होती का, याबाबत त्यांना विचारणा केली असता तक्रार प्राप्त झाली असून ती शासनाकडे पाठविली असल्याचे डॉ. प्रधान यांनी स्पष्ट केले.
हेल्पलाइनवरून चार लाचखोरांवर कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्टाचार कमी करण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जात आहे. तक्रार आल्यानंतर या वर्षी आतापर्यंत १७४ वेळा सापळे रचण्यात आले. त्यापैकी पुणे जिल्हय़ात ६५ सापळे रचण्यात आले. लाचेची मागणी होत असल्यास तक्रार देण्यासाठी सुरू केलेल्या १०६४ या हेल्पलाइनचा चांगला उपयोग झाला असून त्याद्वारे चार ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत या हेल्पलाइनवर ६९ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी बहुतांश तक्रारी चौकशीसंदर्भातील होत्या.
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2014 रोजी प्रकाशित
शहरातील शासकीय कार्यालयांवर आता एसीबीची नजर
तक्रारदाराची वाट पाहात न बसता एसीबीचे अधिकारी संबंधित कार्यालयात तक्रारदार शोधून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहेत.
First published on: 04-11-2014 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acb corruption crime govt office