घरफोडी व मोटार सायकलींच्या चोरीमधील तीन आरोपींना प्रॉपर्टी सेल गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी मुंढवा, चंदननगर व हडपसर या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.
सुहास ऊर्फ सोस्या काळुराम रासगे (वय १९, रा. किर्तने बाग, मुंढवा.), कुंदन शंकर घोडके (वय १९, रा मुंढवा), शंकर भीमराव अल्हाट (वय २०, रा. रासगे आळी, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरफोडी व दुचाकी चोरीतील या आरोपींबाबत पुणे शहर गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलच्या प्रभारी वरिष्ठ नरीक्षक सुषमा चव्हाण व कर्मचारी यशवंत खंदारे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार या आरोपींना अटक करण्यात आली. चव्हाण यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक सुनील गवळी, सहायक फौजदार आजिनाथ वाकसे, विजय साळवी, हवालदार भालचंद्र बोरकर, सिद्धाराम कोळी, संजय सुर्वे, संभाजी गायकवाड, अमोल भोसले, यशवंत खंदारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.