औंध जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांना दिले. त्यानुसार, पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनायक मोरे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
सोमवारी अजितदादा पुण्यात होते, तेव्हा आमदार जगतापांनी त्यांची भेट घेतली. रुग्णालयाच्या संदर्भातील विविध १४ मुद्दे असलेले निवेदन त्यांनी अजितदादांना दिले व  रुग्णालयाच्या कारभाराच्या चौकशीची मागणी केली. त्यानुसार, अजितदादांनी डॉ. परदेशी यांनी तेथील कारभाराची चौकशी करावी, असे आदेश दिले. याबाबतचे आदेश अद्याप आपल्याला प्राप्त झाले नसल्याचे आयुक्त परदेशी यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात, जिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले, की जगताप यांनी आपले म्हणणे अजितदादांकडे एका निवेदनाद्वारे मांडले. तेव्हा त्यावर पिंपरी आयुक्तांनी चौकशी करावी, असा शेरा मारला आहे. याबाबतच्या सूचना आयुक्त परदेशी यांना मंगळवारी मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
रुग्णालयात आवश्यक यंत्रसामग्री व उपकरणे असूनही अतिदक्षता विभाग बंद आहे. अत्यवस्थ अवस्थेतील रुग्ण बाहेर पाठविले जातात. त्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. निवासस्थाने असूनही डॉक्टर राहत नाहीत, ते ‘ऑन कॉल’ आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय परीक्षण दिशाभूल करणारे असून त्याची फेरतपासणी करावी. डायलिसिस उपकरणांची खरेदी करूनही त्याचा वापर नाही. डॉक्टरांचे वेतन व बायोमॅट्रीक उपकरणांचा अहवाल यात तफावत आहे. रुग्णालयातील दोन्ही व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत. औषधे उघडय़ावर पडलेली असतात. कालावधी संपूनही डॉक्टरांच्या बदल्या होत नाहीत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात चुकीच्या पद्धतीने खरेदी करण्यात आली आहे. रुग्णालयातील निवासस्थानांचा खासगी व्यक्ती वापर करतात आदी मुद्दे जगताप यांनी निवेदनात मांडले आहेत.