चातुर्मास सुरू झाला. सणवार, पूजाअर्चा, व्रतवैकल्याचे हे चार महिने. या महिन्यांत उपवासाचे पदार्थ, गोडधोड, पक्वान्नांची रेलचेल असते. अशा वेळी हाताशी लागतो नारळ. नवीन गाडी घ्या, भूमीचे पूजन करा, कोणाचा सत्कार करा, शुभ कार्य सुरू करा त्यासाठी लागतो नारळ. असे अनन्यसाधारण महत्त्व असलेला नारळ आपल्या दारात असावा असे कोणाला नाही वाटणार? जमिनीचा छोटा तुकडा जरी घेतला, तरी झाडे लावाताना प्राधान्य दिले जाते नारळाचा झाडाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारळ माड (पाम) कुळातला. त्याच्या मातृभूमीविषयी अनेक कथा असल्या तरी भारतात तो हजारो वर्षांपासून रुजला आहे. उष्ण दमट हवा, खारे वारे, क्षारधर्मी पाण्याचा निचरा होणारी माती नारळास आवडते. म्हणूनच ती सागर किनारी सहज रुजतात. इंदिरा संतांनी त्याचे वर्णनच केले आहे..

मोहिनी पडून तुझ्या भव्य रूपाची,

ही उभी नारळी इथे असे केव्हाची,

सावळी कृशांगी, सुधाकुंभ घेऊन,

सागरा पाहते वाट तुझी हरखून।

सागर किनारा हा आवडत असला, तरी नारळ वेगवेगळ्या हवामानातही रुजतो. रोपवाटिकांमध्ये उंच वाढणारा बामणोली व बुटकी सिंगापुरी जात मिळते. दोन बाय दोनचा खड्डा करून माती, शेणखत मिसळून रोप लावले जाते. क्षारधर्मासाठी मिठाचे रिंगण करतात. कडक उन्हापासून जपण्यासाठी सावलीची व्यवस्था करावी लागते. सिंगापूर जातीस लवकर फळे लागतात. बामणोलीस सहा-सात वर्षे लागतात. नारळाची पाने झावळ्या १२-१५ फूट वाढतात. या साठी वेळोवेळी मासळी खत, जीवमृत, शेणखत द्यावे लागते. नारळाचा फुलोरा मोठा असतो. परागीभवनानंतर छोटे नारळ लागतात. उंदीर व खारी याचे नुकसान करतात. म्हणून खोडास गोल पत्रा गुंडाळावा लागतो.

नारळास बाजारमूल्य असल्याने वने, झाडे काढली जाऊन तेथे नारळाने स्थान मिळवले. त्यामुळे जैवविविधतेस धोका निर्माण झाला. पुण्यासारखा शहरात बंगल्यांच्या वसाहतीत नारळ लावले जातात. सुरुवातीच्या काळात त्याची देखभाल होते. पुढे फारशी देखभाल न करता झाडे फळत राहतात. झाडांची उंची पन्नास फूट वाढते, नारळ काढणे जिकिरीचे होते. तसेही नारळ काढणे कौशल्याचे काम आहे. यासाठी आजकाल माणसे मिळत नाहीत. नारळ आपोआप खाली पडतात. ‘नारळाच्या झाडाखाली गाडी लावू नये, नुकसान झाल्यास जबाबदार नाही’ अशा पाटय़ा बघायला मिळतात. काही लोक झाडाखाली जाळी बसवून घेतात. कारण नारळ शेजाऱ्यांच्या कुंपणात पडून नुकसान होते. नारळाच्या झाडाखालची जागा वापरता येत नाही. कारण नारळ, झावळ्या पडू शकतात. खरे तर झावळांचा उपयोग घरे शाकारण्यासाठी, डोंगर उतारावर बांध करून पाणी अडवण्यासाठी होऊ शकतो. पण शहरात त्याचे काय करणार? झावळ्यांपासून खराटे करतात. पण हेही हस्तकौशल्याचेच काम. आजकाल तेही करून द्यायचे तर माणसे शोधावी लागतात. रस्त्यावर ट्रान्फॉर्मरच्या मागे झावळ्या कोंबून ठेवलेल्या दिसतात. शहाळी म्हणजे असोले नारळ, त्यातील मधुर पाणी प्यायचे तरी ते सोलण्याचे कौशल्य हवे. नारळ सोलून घेतले तर सोल्यांचे (वरच्या सालांचे) काय करायचे प्रश्नच पडतो. काही ठिकाणी चुलीत जाळण्यासाठी त्याचा वापर करतात. नारळ आले की एकदम तीस-चाळीस वा अधिक येऊ शकतात. त्याचे काय करायचे प्रश्न पडतो. कारण बऱ्याच बंगल्यांमध्ये झाडे असतातच. नारळाच्या करवंटय़ांपासून उत्तम कोळसा होतो. पण एक-दोन झाडे असतील तर ते करणेही शक्य नाही. खोबऱ्याचे पदार्थ करायचे तरी हस्तकौशल्य हवे, अन् वेळही हवा!

केरळमध्ये नारळ शेती मोठय़ा प्रमाणात करतात. शहाळ्याच्या सोल्यापासून कोकोपीथ बनवून त्याच्या विटा विकतात. पूर्वी पुण्यात मिळत नसत तेव्हा आम्ही केरळहून कोकोपीथ मागवत असू. आता इथेही सहज उपलब्ध आहे. नारळाचा गुण असा, की त्याचा कोणताच अवयव पटकन कुजत नाही. पण त्यामुळे त्यापासून खत होण्याच्या प्रक्रियेसही वेळ लागतो. झावळ्याच्या आकारमानामुळे आवारात ठेवणे अवघड होते. आमच्या घराच्या मागच्या बंगल्यात जुने नारळाचे झाड ४५ अंश डिग्रीपर्यंत तिरके झाले. त्याच्या झावळ्या कापल्यावर ते सरळ झाले, त्या कापण्यास सहा हजार रुपये खर्च आला.

नारळाच्या प्रत्येक भागाचा वापर करता येतो. पण ते करण्यासाठी हवेत तरबेज हात, हस्तकौशल्य असलेले कष्टकरी हात. परसबागेत नारळ लावण्याची हौस सगळ्यांना असते. कारण हा आहे कल्पवृक्ष.. पण विचार करा, की आपल्याला पेलेल का हे शिवधनुष्य.

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about coconut tree plantation