कोटय़वधी रुपयांचा कर चुकविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या हसन अली खान याच्यावर पुण्यात पारपत्र (पासपोर्ट) कार्यालयास खोटी माहिती दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्य़ात चतु:शृंगी पोलिसांनी नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. त्याच्यावर फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, पासपोर्ट अॅक्टअनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसन अली हा २००३ मध्ये लंडनला गेला होता. या ठिकाणी त्याने आपला पारपत्र हरवल्याची तक्रार भारतीय दूतावासाकडे केली होती. त्या वेळी भारतीय दूतावासाकडून त्याला एक तात्पुरता पारपत्र देण्यात आला होता. त्या पासपोर्टवर अली हा पुण्यात आला. त्यानंतर त्याने पारपत्रचे नूतनीकरण करण्यासाठी संपर्क साधला. त्या वेळी त्याने पत्नीचा हैदराबाद येथील पत्त्याचा पुरावा दिला होता. यावर पुणे पारपत्र कार्यालयाकडून त्याला २००४ मध्ये पारपत्र देण्यात आला. त्यानंतर ईडीने अलीला अटक केली. त्या वेळी त्याच्याकडे अनेक पारपत्र असल्याचे आढळून आले. त्याच बरोबर पुण्याच्या पारपत्रवर दिलेल्या पत्त्याच्या वेळी त्याने पत्नीशी तलाक घेतला होता. त्यामुळे पुणे पारपत्र कार्यालयास पासपोर्टच्या नूतनीकरणा वेळी खोटी माहिती दिल्याप्रकरणी अली विरुद्ध २२ डिसेंबर २०११ रोजी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पारपत्र कार्यालयाच्या अधिकारी शकुंतला राणे यांनी तक्रार दिली होती. या गुन्ह्य़ात अलीला ११ मार्च २०१३ रोजी आर्थर रोड कारागृहातून पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. चतु:शृंगी पोलिसांनी त्याचा जबाब, हस्ताक्षराचे नमुने घेतले होते.
या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी अलीवर नुकतेच शिवाजीनगर न्यायालयात अरोपपत्र दाखल केले आहे. साधारण तीस ते चाळीस पानांचे हे आरोपपत्र आहे. त्यामध्ये कागदोपत्री पुरावा, साक्षीदारांचे जबाब आहेत. अलीवर ४२०, ४६७, ४६८, पारपत्र अॅक्ट १०(३), १२(१) या कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2013 रोजी प्रकाशित
हसन अलीवर आरोपपत्र दाखल
कोटय़वधी रुपयांचा कर चुकविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या हसन अली खान याच्यावर पुण्यात पारपत्र कार्यालयास खोटी माहिती दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्य़ात चतु:शृंगी पोलिसांनी नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे.
First published on: 11-06-2013 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Charge sheet admitted on hasan ali for fake passport