राज्यात ‘सिकल सेल अॅनिमिया’ या आजाराचे सुमारे अडीच लाख रुग्ण असून त्याच्या वीस पट म्हणजे सुमारे पन्नास लाख व्यक्ती या आजाराच्या वाहक आहेत. हा आनुवांशिक आजार राज्याच्या प्रामुख्याने दुर्गम भागांत आढळत असून या भागांतील तेली समाज व शाहू समाजात आजाराच्या निदानासाठी रक्तचाचणी करून घ्यायची मानसिकता वाढत आहे. असे असले तरी अजूनही विवाह करताना वर व वधू हे दोघेही सिकल सेलचे रुग्ण तर नाहीत ना याची खात्री मात्र केली जात नाही, अशी निरीक्षणे ‘महाराष्ट्र आरोग्य मंडळा’ च्या सिकल सेल विभागाचे प्रमुख डॉ. एस. एल. काटे यांनी नोंदवली आहेत.
मंडळातर्फे नंदुरबार जिल्ह्य़ातील धडगाव तालुक्यात सिकल सेल दवाखाना चालवला जातो. डॉ. काटे म्हणाले, ‘‘सिकल सेल या आजारात रक्तातील तांबडय़ा पेशी गवत कापण्याच्या विळ्यासारख्या आकाराच्या होऊन त्या लवकर फुटतात. त्यामुळे रक्तक्षय म्हणजे ‘सिकल सेल अॅनिमिया’ होतो. राज्याच्या १९ जिल्ह्य़ांमध्ये प्रामुख्याने दुर्गम भागांतील आदिवासी जमातींमध्ये हा आजार आढळतो. आजार आढळण्याची शक्यता असलेल्या भागांतील नागरिकांची रक्त चाचणी करून संस्थेतर्फे त्यांना ते सिकल सेलचे प्रत्यक्ष रुग्ण किंवा वाहक आहेत का, हे सांगणारी रंगीत कार्डे वाटली जातात. हा आजार आनुवंशिक असून तो पूर्णत: बरा करणारे परवडण्याजोगे औषधोपचार देशात उपलब्ध नाहीत. सिकल सेलच्या रुग्ण वा वाहकाने सिकल सेलच्या दुसऱ्या रुग्ण वा वाहकाशी विवाह केल्यास होणाऱ्या अपत्यालाही सिकल सेल आजार असू शकतो. त्यामुळे आजाराला अटकाव करण्यासाठी सिकल सेलची रुग्ण असलेली संतती जन्मास येऊ नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. संस्थेतर्फे रुग्णांना कोणत्या पद्धतीचे विवाह टाळावेत याचे मार्गदर्शन गेली दहा वर्षे केले जात आहे, तरी अजूनही एकमेकांची कार्डे पाहून विवाह करण्याची मानसिकता रुजलेली नाही. आपल्याला हा आजार आहे हे इतरांना कळले तर आपले लग्नच होणार नाही, ही भीती यामागे दिसते.’’
लग्नाआधी व्यक्तीची सिकल सेलची तपासणी करण्यात आलेली नसली, तर स्त्री गरोदर असताना या आजारासाठी तिची रक्त चाचणी केली जाते. जर गरोदर महिला सिकल सेल आढळला, तर तिच्या पतीचीही रक्तचाचणी केली जाते. पतीलाही हा आजार असेल, तर त्यांचे होणारे अपत्य गर्भावस्थेत असतानाच त्याची या आजारासाठी चाचणी (प्री नेटल डायग्नोसिस) केली जाते. या चाचणीत हे अपत्य आजाराचे रुग्ण आढळल्यास ती संतती होऊ न देण्याचा सल्ला दिला जातो.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jun 2013 रोजी प्रकाशित
विवाह ठरवताना ‘सिकल सेल’ आजार विचारात घ्यायचे प्रमाण कमीच!
राज्यात ‘सिकल सेल अॅनिमिया’ या आजाराचे सुमारे अडीच लाख रुग्ण असून त्याच्या वीस पट म्हणजे सुमारे पन्नास लाख व्यक्ती या आजाराच्या वाहक आहेत.
First published on: 19-06-2013 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Check up of sickle cell disease before marriage is essentials